मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या पुत्रासह ६ अटकेत

(crime news) सोलापुरात ड्रेनेजच्या चेंबरमध्ये श्‍वास गुदमरून चार मजुरांच्या मृत्युप्रकरणी ठेकेदार कंपनी दास ऑफशोअरचे संचालक व मिरजेचे भाजप आमदार सुरेश खाडे यांचे पुत्र सुजित सुरेश खाडे (वय 31, रा. दास बंगला, 100 फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) यांच्यासह सहा जणांना अटक केली.

सुजित खाडे, संतोष दिलीप बडवे (वय 51, रा. प्लॉट नं. 4, द्वारका रेसिडेन्सी, जयजलाराम नगर, जुळे सोलापूर), महानगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता महमंद हनिफ हबीबअल्ला बक्षी (51, रा. 3 हेवन प्राईड, शनिवार पेठ, पेंटर चौक, सोलापूर), अतुल विष्णुपंत भालेराव (52, रा. 46, शिक्षक हौसिंग सोसायटी, ऑफिसर क्‍लबसमोर, सोलापूर), व्रज कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक केयूर भरतभाई पांचाल (29, रा. 36, मेघा बंगलोज, गुजरात ग्लास पाठीमागे, जशोदानगर चोकडी, कोकरा, अहमदाबाद, गुजरात सध्या वालचंद कॉलेजच्या पाठीमागे, सोलापूर), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील अधिकारी विजय भिवाजी गायधनकर (वय 52, रा. 552, उत्तर सदर बझार, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार सोमवारी पोलिसांनी हि कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, अक्कलकोट मार्गावरील मुद्रा सन सिटी हॉस्पिटलच्या बाजूला महानगरपालिकेच्या वतीने अमृत योजनेंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. या कामाचा महापालिकेने दास आँफशोअर कंपनीला ठेका दिला आहे. त्यानंतर दास आँफशोअर कंपनीने यात व्रज कन्स्ट्रक्शन यांना सब ठेकेदारी दिली. सोबतच त्यावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष देखरेख करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आणि सोलापूर महानगरपालिका यांची होती.

यामध्ये वरील सर्व विभागांनी प्रत्यक्षात काम करताना व ड्रेनेज लाईन दुरुस्ती करताना त्यांचे इंजिनीयर, सुपरवायझर व कामगार यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने, ऑक्सिजन मास्क, ग्लोव्हज, सेफ्टी बेल्ट, बाहेरून ऑक्सिजन पुरवठा करणारी साधने व ड्रेनेज होलमध्ये काम करताना लागणारी साधने उपलब्ध करून देणे गरजेचे होते. पण ती उपलब्ध करून न देता तसेच योग्य ती खबरदारी न घेता बेजबाबदारपणे संबंधितांनी कामगारांच्या जीवितास धोका निर्माण केला. (crime news)

त्यामुळे 23 डिसेंबर रोजी सायंकाळी ड्रेनेज चेंबर मध्ये काम करणारे कामगार बेचन ऋषिदेव, इंजिनीयर विशाल हिप्परकर, सुपरवायझर सुनील ढाका, आशिषकुमार राजपूत यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सोलापूर मनपाचा संबंधित विभाग, दास ऑफशोअर कंपनी, व्रज कन्स्ट्रक्शन कंपनी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा संबंधित विभाग यामधील अधिकारी व कर्मचारी हे जबाबदार आहेत, म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पेटकर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सहायक पोलिस आयुक्‍त डॉ. संतोष गायकवाड हे करीत आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी वरील सर्वांना अटक केली. त्यांना अटक करून दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुळ यांनी सर्वांना जामीन दिला.

मनपात भाजपची सत्ता; ठेकाही भाजप आमदाराकडे

सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे. शिवाय सोलापुरात अमृत योजनेतून सुरू असलेले हे काम सांगली जिल्ह्यातील दास ऑफशोअर कंपनीला देण्यात आले आहे. दास ऑफशोअर ही कंपनी मिजजेचे भाजपचे आमदार व माजी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांच्याशी संबंधित आहे. त्या कंपनीचा त्यांचा मुलगा सुजित हा संचालक आहे. सोलापुरातील ड्रेनेजच्या कामाची जबाबदारी त्याच्याकडे असल्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे पुन्हा एकदा शासकीय कामांच्या ठेकेदारीत होत असलेला राजकीय हस्तक्षेप चर्चेत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *