सांगलीत बंटी-बबलीने सहा जणांना 53 लाखांचा घातला गंडा!

कमी दरात सोने देतो आणि झटपट नफा मिळवण्याची एक स्कीम आहे, असे सांगत सांगलीमध्ये सहा जणांना एका दाम्पत्याने तब्बल 52 लाख 90 हजाराचा गंडा घातलाय. 10 हजाराने कमी सोने मिळेल असे सांगून या बंटी-बबली जोडीने काही लोकांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. विराज विजय कोकणे आणि दीपाली विराज कोकणे असे फसवणूक केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये कोकणे दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून सध्या हे कोकणे दाम्पत्य फरार असून त्यांचा मोबाईल देखील बंद आहे. मोबाईल बंद ठेवत संपर्क तोडल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर ज्या लोकांनी कोकणे दाम्पत्याकडे पैसे गुंतवले होते, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत कोकणे दाम्पत्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय.या प्रकरणातील फिर्यादी भास्कर मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने झटपट नफा मिळवण्यासाठी माझ्याकडे एक स्कीम असल्याचे त्यांना सांगितले. यात 10 हजार इतक्या कमी दराने सोनं मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. अशाच आणखी काही लोकांना देखील झटपट नफा मिळेल असे सांगत पैसे गुंतवण्यास सांगितले आणि काही लोकांनी लाखोंनी पैसे गुंतवले. काहींनी तर बँकेतील आणि मित्राकडून उसने पैसे घेऊन कोकणेला दिले होते.

फिर्यादी भास्कर मुळीक यांनी सुरुवातीला कोकणेकडे 3 तोळ्याची रोख दिली. कोकणेने या लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी मुळीक यांना तीन तोळे सोने आणि या सोन्याची अधिकृत पावती देखील दिली. कमी दरात सोने मिळतंय याची खात्री पटल्याने मुळीक यांनी कोकणेला पुन्हा काही रक्कम दिली. यावेळी कोकणेने दोन दिवसात सोने आणून देतो असे सांगितले. मात्र, ते दिलेच नाहीत. मुळीक जेव्हा कोकणेच्या घरी गेली त्यावेळी तिथे कुणी नसल्याचे कळताच आपली फसवणूक झाल्याचे मुळीक यांच्या लक्ष्यात आले. मुळीक यांच्याबरोबर आणखी काही लोकांनी कोकणेला झटपट नफ्याचे आमिषापोटी आणि कमी दरात सोने मिळतेय या आमिषाने कुणी 8 लाख, कुणी 5 लाख तर कुणी 10 -14 लाख इतकी मोठी रक्कम कोकणेला दिली. यामुळे कोकणे दाम्पत्याने केलेल्या या सहा लोकांचा फसवणुकीचा आकडा हा 53 लाखाच्या जवळ गेलाय. तर अनेकजण बदनामी होईल म्हणून पुढं येत नसल्याने कोकणेने आणखी काही लोकांना गंडा घातला असल्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *