जन्मदात्याबरोबर मुलाचे भयंकर कृत्य
(crime news) पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. 80 वर्षांच्या वृद्ध वडिलांचा मुलानं गळा चिरून हत्या केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ माजली आहे. आपल्या वृद्ध वडिलांनी 80 व्या वर्षी लग्न करण्याच्या हेतूनं वधू वर सुचक मंडळात नाव नोंदणी केली, म्हणून जन्मदात्याचा निर्घृण खून केला आहे.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आपल्या वृद्ध वडिलांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने याबत जर समाजात समजले तर आपला अपमान होईल. तसेच प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार होईल या रागात मुलानं थेट वडिलांच्या गळ्यावर कांदा कापण्याची सुरी फिरवली. तसंच बोथट सुरीने गळा कापेना म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांना संपवलं. शिवाय या मुलाने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होऊन या गुन्ह्याची माहिती देत तो फिर्यादी झाला.
खेड तालुक्यातील राजगुरूनगर शहरात गुरुवारी 06 जानेवारीला संध्याकाळी नात्याला काळिमा फासणारी खळबळजनक घटना घडली आहे. शंकर रामभाऊ बोऱ्हाडे, (वय- ८० वर्ष) असे मृत वडिलांचं नाव आहे. तर शेखर शंकर बोऱ्हाडे असे आरोपी मुलाचं नाव आहे. (crime news)
आरोपी मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं की, माझे वडील शंकर रामभाऊ बोऱ्हाडे यांनी परस्पर वधू -वर सुचक मंडळात पैसे भरून स्वतःच्या लग्नाची नोंदणी केली. नोंदणी करुनही ते माझ्याशी खोटं बोलले. याचा राग मला अनावर झाल्याने मी किचन रूममधील कांदा कापण्याची सुरी हातात घेऊन वडिलांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरीला धार नसल्याने गळा कापला गेला नाही. म्हणून मी घरात असलेल्या दगडी वरवंटयाने तोंडावर आणि डोक्यात मारून त्यांचा खून केला.