महाविकासआघाडीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम

(political news) मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून सर्वच्या सर्व २१ जागांवर बाजी मारणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना महाविकासआघाडीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धक्का दिला आहे. मजूर वर्गातून अपात्र ठरल्यामुळे प्रवीण दरेकर यांनी ऐनवेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे विधानपरिषद आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना पुढे केले होते. प्रसाद लाड यांच्या माध्यमातून मुंबै जिल्हा बँकेची सूत्रे आपल्याच हातात ठेवण्याचा दरेकर यांचा मानस होता. परंतु, गुरुवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे दरेकर यांच्या मनसुब्यांना सुरुंग लागला. महाविकासआघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सिद्धार्थ कांबळे यांना अध्यक्षपदी बसवले.

मुंबै बँकेच्या निवडणुकीत बाजी मारल्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्येही दरेकर सर्व गणितं सहजपणे जुळवून आणतील, असा कयास होता. मात्र, शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी अचूक व्यवस्थापन करत प्रसाद लाड यांना अध्यक्षपदापासून दूर ठेवले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबै बँकेतील राष्ट्रवादी व सेनेच्या संचालकांची मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस असा महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचा निर्णय झाला.

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत २१ संचालकांपैकी २० जणांनी मतदान केले. त्यापैकी कांबळे यांना ११, तर लाड यांना नऊ मते मिळाली. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध (political news) करण्याचा दरेकर यांचा प्रयत्न होता. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका होणार याची कुणकुण लागल्याने दरेकर यांनी स्वत: मैदानात उतरण्याऐवजी ऐनवेळी प्रसाद लाड यांना पुढे केले. पण, महाविकासआघाडीने करेक्ट कार्यक्रम केल्याने प्रसाद लाड यांचा पराभव झाला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपच्या उमेदवाराचा पराभव थोडक्यात टळला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर व भाजपचे विठ्ठल भोसले यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून विजयी उमेदवार ठरविण्यात आला. त्यात भाजपचे विठ्ठल भोसले विजयी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *