धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट; चाहत्यांना मोठा झटका
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या या दोघांनी तब्बल १८ वर्षांनंतर आपल्या वैवाहिक आयुष्यातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियातून पोस्ट करून दोघांनी पती-पत्नीचं नातं तुटल्याची माहिती दिली आहे. धनुष आणि ऐश्वर्या जोडी पाॅवर कपल म्हणून प्रसिद्ध होती. पण, त्यांच्या या निर्णयाने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. (Tollywood)
धनुषने पोस्ट लिहिताना म्हटलं आहे की, “आम्ही १८ वर्षांपर्यंत दोस्ती, कपल, पॅरेंट्स आणि एकमेकांचे शुभचिंतक होऊन ग्रोथ आणि समजुतदारपणा दाखवत वैवाहिक आयुष्याचा मोठा काळ पार पाडला. आज आम्ही दोघे जिथे उभे आहोत तेथून दोघांचा मार्ग वेगळे झालेले आहेत. मी आणि ऐश्वर्या एक ‘कपल’ या चौकटीतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतःला आणखी चांगलं समजण्यासाठी वेळ घेत आहोत. आमच्या निर्णयाचा सन्मान करा आणि आमच्या खासगी आयुष्याचा विचार करा.”यापूर्वी २ ऑक्टोबरला दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध कपल सामंथा आणि नागा चैत्यन्य यांचाही घटस्फोट झाला होता. ६ ऑक्टोबरला सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या लग्नाला ४ वर्षे पूर्ण होणार होते. मात्र, त्याआधीच त्यांचा घटस्फोट झाला. तीन महिन्यांच्या आत धनुष आणि ऐश्वर्या यांचा वेगळे होण्याचा निर्णय झाल्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टारच्या चाहत्यांना चांगलाच झटका बसला आहे.