अल्पवयीन मुलीवर 10 जणांचा सामूहिक बलात्कार
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. आता रायगड जिल्ह्यातून (Raigad district) एक धक्कादायक बातमी (gang rape) समोर आली आहे.एका 17 वर्षीय मुलीवर 10 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार (17 year old girl gang rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वाशी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी 17 वर्षीय आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तिच्या दोन मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. याची माहिती त्यांच्या मित्रांना कळाली आणि मग त्या मित्रांनी पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली.पीडित मुलीला धमकी देत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला.
वडखळ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 7 जणांना अटक केली आहे. तर अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. या कृत्यात आणखी काही तरुणांचा समावेश असल्याचा संशयही पोलिसांना आहे. फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात वडखळ पोलीस अधिक तपास करत आहेत.