संतापजनक! 6 अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार
(crime news) देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच दरम्यान एक संतापजनक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे एका 7 वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील 6 अल्पवयीन मुलांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलांनी मोबाईलवर व्हिडीओ पाहून हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांनी गेम खेळतानाच 7 वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार केला. ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी मुलांना मोबाईल दिला होता. पण त्यांनी त्याचा भलताच वापर केल्याचं आता समोर आलं आहे. एकाच कुटुंबातील 7 ते 13 वर्षे वयोगटातील 6 मुले मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहून मागील दीड महिन्यांपासून पीडित मुलीचे लैगिक शोषण करीत होते. याचदरम्यान मुलीची प्रकृती खालावली आणि तिच्या पोटात दुखू लागले होते. या प्रकाराबाबत घरातील कोणालाच काही कल्पना नव्हती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीडित मुलीच्या मोठ्या भावाला सर्वात आधी या गैरकृत्याबाबत संशय आला आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराला वाचा फुटली. मुलीच्या मोठ्या भावाने शेजारील मुले त्याच्या बहिणीवर बलात्कार करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर संबंधित घटनेच्या संशयातून त्याने कुटुंबीयांना अलर्ट केले. कुटुंबीयांनी आरोपी मुलांकडे विचारपूस केली असता त्यांनी बलात्कार केल्याची बाब कबूल केली. त्यानंतर पीडित मुलीला तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आणि ही घटना पोलिसांनाही (crime news) कळवण्यात आली.
नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या मोबाईलमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून पॉर्न साइट्स पाहण्याच्या लिंक सापडल्या आहेत. किशोरवयीन मुलासोबतच इतर मुलेही या मोबाईलवरून व्हिडीओ पाहत असत. पोलिसांच्या चौकशीत, मुलांना त्यांच्या कुटुंबीयांनी ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी होऊन अभ्यास करण्यासाठी मोबाईल दिल्याचे समोर आले. मोबाईल दिल्यानंतर मुले काय वापरतात याकडे कुटुंबीयांनी लक्ष दिले नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ आणि लिंक सापडल्या आहेत. या साइट्सवर मुले कशी प्रवेश करतात याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.