शिरोळ – आंदोलन अंकुश कडून गुरुदत्त शुगर्स वर धडक
शिरोळ/प्रतिनिधी – रोहित जाधव
(local news) गुरुदत्त शुगर्स टाकळी वाडी या कारखान्याने चालू गळीत हंगाम 2021- 22 मध्ये ऊस बिला मधून शेतकऱ्याच्या संमतीविना दंडूकशाही तंत्राचा वापर करून पाटबंधारे विभाग महाराष्ट्र राज्य यांची शासकीय पाणीपट्टी ची रक्कम वजा करण्याचा प्रकार केला आहे. शेतकऱ्यांना कोणी कैवारीच न उरल्याने त्याबाबत ऊस उत्पादक अनेक शेतकऱ्यांनी आपली व्यथा आंदोलन अंकुश या सामाजिक संस्थेकडे मांडली. म्हणून याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन अंकुश कडून गुरुदत्त शुगर्स वर धडक देण्यात आली.
संमतीविना कोणतीही सरकारी, खाजगी कपात करण्याचा आपले कारखान्यास अधिकार पोहोचत नाही. अनेक देणी वसूल करून देण्याचा आपण पठाणी ठेका घेतला आहे का? की आपण खाजगी सावकारकी सुरू केली आहे. कारखान्याचे देणे, सेवा सोसायट्यांचे देणे, शासकीय देणे अशी सर्व देणी वसूल करून शेतकऱ्यांना काय शून्य रुपयांच्या पावत्या पाठवणार आहात काय? आणि तो अधिकार आपणाला कोणत्या कायद्याने मिळाला .अशी विचारणा आंदोलन अंकुश कडून दिपक पाटील यांनी ऊस विकास अधिकारी उदय पाटील यांना केली. आपणाकडून झालेली वसुली पठाणी पद्धतीची असल्याने ती तात्काळ थांबवावी. व आतापर्यंत केलेली कपातीची रक्कम ज्या त्या शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावी. तसे लेखी आदेश आपल्या जमा- खर्च व शेती विभागास त्वरित द्यावेत. अन्यथा आपल्या कारखान्याची इथेनॉल व साखर वाहतूक रोखली जाईल. असा इशारा अंकुश च्या वतीने गुरुदत्त शुगर्स प्रशासनास देण्यात आला. (local news)
यावेळी कारखान्याचे ऊस विकास अधिकारी उदय पाटील यांनी तात्काळ जमा – खर्च विभागास भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून संमती नसलेल्या शेतकऱ्यांची कपातीची रक्कम त्वरित त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याच्या सूचना केल्या. तर यापुढे संमतीशिवाय कपात करणार नाही. असे जाहीर आश्वासन दिले . यानंतर निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी भीमराव माने ,अनिल कोळी, अजित पाटील, सचिन वाणी, तुकाराम पाटील, धनाजी पाटील, अनिल माने, सुदिप पाटील, उत्तम सिंग रजपूत, आदी शेतकरी उपस्थित होते.