पोलिस असल्याचे सांगून वाहन चालकाला लुटले

इंदापूर बारामती राज्यमार्गावर निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील इरिगेशन कॉलनी येथे ६ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेएक वाजता ‘सीआयडी पोलिस आहे’ अशी बतावणी करत ट्रक चालकाची ४६ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबवली. यासंदर्भात हेमराज जगनाथ गुजर (वय २५, रा. कंनकरिया, ता. झावपाटण, जि. झालावाड, राजस्थान) याच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी हे आपल्या ताब्यातील गाडीत (क्र. आरजे १७ जीए ६०५२) राजस्थान येथून कोळसा घेऊन सातारा येथे खाली करण्यासाठी गेले होते. कोळसा खाली केल्यानंतर भाड्याचे रोख ४६ हजार रुपये घेऊन ते राजस्थानला जाण्यासाठी निघाले. मात्र, निमगाव केतकी येथे दोन अज्ञात जणांनी सीआयडी पोलिस असल्याची बतावणी करून पाठीमागच्या दोन वाहनात अफीम सापडल्याने तुमच्या गाडीची तपासणी करायची असल्याचे सांगून गाडी थांबविली. त्यानंतर त्यांनी गाडीच्या टुलबॉक्समधून ४६ हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. याबाबत पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय लिगाडे हे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *