मिरज : आठ लाख रुपयांचा पोलिसाला ऑनलाईन गंडा
बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने बँक खाते क्रमांक व ओटीपी नंबर विचारून घेतला. नंतर अज्ञाताने रेल्वे पोलिसाच्या खात्यावर ऑनलाईन 8 लाख रुपयांचे कर्ज काढून रक्कम हडप केली. याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिस दलातील तानाजी बच्चाराम पसारे यांनी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पसारे यांना दि. 24 जानेवारी रोजी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने “मी स्टेट बँकेतून बोलत आहे. तुमच्या बँक खात्याची केवायसी अपडेट न केल्यास पगाराचे खाते बंद होईल” असे सांगितले. वडील रुग्णालयात असल्याने पसारे यांनी गडबडीत बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला. त्याचा वापर करुन अज्ञाताने पसारे यांच्या बँक खात्याला जोडलेला त्यांचा मोबाइल क्रमांक बदलला. मोबाईल क्रमांक बदलल्याचा मेसेज आल्याने पसारे यांनी बँकेत जाऊन याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या खात्यावर ऑनलाईन 8 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढून त्यातील 7 लाख 75 हजार रुपये काढून घेतल्याचे निदर्शनास आले.
पसारे यांनी पुन्हा बँकेत जाऊन खात्यावरील व्यवहार पाहिल्यानंतर त्यांनी कर्ज घेतले नसतानाही अज्ञाताने बँक खात्याला जोडलेल्या मोबाईल क्रमाकांचा गैरवापर करीत परस्पर वैयक्तिक कर्ज के्रडीट करून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले. पश्चिम बंगालमधील कोलकाता व दुर्गापूर येथील एटीएममधून पसारे यांच्या खात्यावरील काही रक्कम काढल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पसारे यांनी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली आहे. याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.