जेवणाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल व्यावसायिकाला मारहाण;
ठाण्यातील भिवंडी येथे जेवणाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका हॉटेल व्यवसायिकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सोमवारी पहाटेची असून, ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पडघा पोलीस करत आहेत.
भिवंडी तालुक्यातील कासणे परिसरात असलेल्या ढाब्यावर जेवणाचे पैसे मागितले म्हणून ढाब्याच्या चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी, १४ फेब्रुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुंबई-नशिक महामार्गावर असलेल्या मराठा ढाबा येथे ही घटना घडली. प्रमोद एकनाथ भेरे असे मारहाण झालेल्या ढाब्याच्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्यात ढाब्याच्या चालकाला मारहाण करणाऱ्या दोन जणांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुंडलिक गोरले आणि सागर चौधरी असे मारहाण करणाऱ्या दोघांची नावे असून, ते स्थानिक गावगुंड असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोघांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार नोंदवल्यानंतर भिवंडी पडघा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेत पुढील तपास सुरू केला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर ढाबे आणि हॉटेल्स सुरू आहेत. त्यामुळे परिसरातील गावगुंडाकडून नेहमीच अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटना घडत असल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या परिसरात गस्त वाढविण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.