सांगली पोलिसांची धडक कारवाई
(crime news) कुपवाड येथे भिशीच्या नावाने सावकारी करणार्या बसवराज शिवय्या मठपती याला अटक केली. त्याच्याकडून रोख 41 हजार 150 रुपये, मोटार , कोरे बॉन्ड व कोरे धनादेश जप्त करण्यात आले. सावकारी प्रतिबंधक विभाग आणि कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी सांगितले, सावकार मठपती हा वार्षिक भिशी सुरू करून त्या भिशीच्या आधारे लोकांना 4 टक्के व 10 टक्के दराने पैसे देतो. मासिक व्याज घेत होता. तो बर्याच मजुरांना मासिक व्याजाने पैसे देऊन त्यांचे पैसे भिशीतून वर्ग करून स्वतः वापरत होता.
बर्याच लोकांना त्याने 20 ते 30 हजार रुपये कर्ज देऊन त्यांच्याकडून दुप्पटीने व्याज गोळा करीत होता. सावकाराच्या त्रासामुळे कर्जदार व्यक्तीने पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. (crime news)
सावकारी प्रतिबंधक विभाग आणि कुपवाड पोलिसांनी सावकार मठपतीच्या घरावर आज छापा टाकला. त्याच्याकडून रोख 41 हजार 150 रुपये, मोटार तसेच कोरे धनादेश व कोरे बॉन्ड असा 8 लाख 41 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये एमआयडीसी कुपवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुपवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील, सावकारी प्रतिबंधक विभागाचे उपनिरीक्षक आर. एफ. मिरजे, विभागामधील पोलिस मदुसदर पाथखट, संदीप पाटील, फौजदार युवराज पाटील, सतीश माने, प्रताप पवार, अरुणा यादव, सूरज मुजावर यांनी ही कारवाई केली.