सांगली : इस्लामपुरात लतादीदींसाठी गायिली सलग ९२ गाणी

भारतरत्न गानकोकीळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली म्हणून इस्लामपूरमधील राजारामबापू नाट्यगृहात त्यांच्या 92 गाण्यांचे सलग 11 तास सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्याम-संध्या सांस्कृतिक मंचतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलाकारांच्या सुरेल आवाजाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
ए मालिक तेरे बंदे हम, झिलमिल सितारोें का, तुमही मेरे मंदिर, जो वादा किया वो, दिल-विल प्यार-व्यार, कितना प्यारा वादा, सत्यम शिवम् सुंदरम्, जाने क्यूं लोग, मेघा रे मेघा रे, गाता रहे मेरा दिल, तुझे जीवन की डोर से, जाने कैसे कब कहाँ, मेहंदी लगा के रखना, सलामे इश्क मेरी जा, गुम है किसी के प्यार में, ये मेरे वतन के लोगों अशी लता दीदींची एकसे बढकर एक अशा 92 गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले.

गायिका ज्ञानेश्‍वरी देशपांडे-पाटील, मयुरी जाधव-चौगुले, गायक विनल देशमुख, शुभम सातपुते, डॉ. राहुल नाकील, सूर्यकांत शिंदे यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सुरू होता. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, विश्‍वासराव पाटील, प्रांताधिकारी संपत खिलारी, डॉ. एन.टी. घट्टे आदींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे निशांत गोंधळी हे प्रत्येक गाण्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगत होते. त्यामुळे लता मंगेशकर यांचे जीवन चरित्राचा उलगडा रसिकांना होत होता. त्यांच्या गाण्यावेळच्या आठवणी, प्रसंग, गंमतीदार किस्से आदींचीही माहिती रसिकांना मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *