प्राध्यापकाकडून पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून निर्घृण खून

चारित्र्यावर संशय घेत व्यसनी प्राध्यापकाने पत्नीच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार करून तिचा निर्घृण खून (murder) केला. ही खळबळजनक घटना आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये रविवारी दुपारी घडली. मारोती विठ्ठल आरके (वय ३५) असे संशयित आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. तर विमल मारोती आरके (वय ३०) असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी विमलची आई जयवंतीबाई माधवराव मसराम (रा. कुऱ्हा) यांनी आर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये राहत असलेल्या मारोती आरके याची अत्यंत गरिबीची परिस्थिती होती. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मारोती याला लोणी येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्राध्यापक म्हणून नोकरी लागली. याच दरम्यान, त्याचा कुऱ्हा येथील विमल हिच्यासोबत विवाह झाला. त्यांचा संसार चांगला चालला होता. त्यांना समर्थ (वय ८) आणि दत्त (वय ४) अशी दोन मुलेही झाली. हसत्या खेळत्या संसाराला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक ? मारोती याला दारूचे व्यसन लागले. तो कायम दारूच्या नशेत राहू लागला. यातून तो पत्नी विमल हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. यातून त्यांच्यामध्ये सतत खटके उडू लागले.
आपण महाविद्यालयामध्ये गेल्यावर आपली पत्नी दुसऱ्यासोबत बाहेर फिरते, असा संशय त्याच्या डोक्यात घर करून गेला. यातूनच त्यांने रविवारी (दि.१३) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पत्नीसोबत वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन मारोतीने विमलच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार (murder) केले. यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या विमलला आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रक्तस्त्राव वाढल्याने विमलला तत्काळ यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री २.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आर्णीचे एपीआय किशोर खंदार, ठाणेदार पितांबर जाधव, योगेश सुंकलवार, मिथुन जाधव, मनोज चव्हाण, अमित झेंडेकर यांनी घटनास्थळी येऊन मारोती आरके याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *