अंकली येथे पोलिसांकडून 11 जणांना अटक

(crime news) अंकली येथे हॉटेल जागेच्या कारणातून दोन गटांत जोरदार राडा झाला. मारामारीत चाकू, काठी आणि दगडांचा वापर झाला. त्यामध्ये चौघे जखमी झाले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील 11 जणांना अटक केली आहे.

शशिकांत माणिकराव जाधव (वय 43, रा. उदगाव, ता. शिरोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र जगन्नाथ वाघमारे (वय 51), योगेश राजेंद्र वाघमारे (वय 26), सौरभ बाळासो बुर्ले (वय 27), सुदर्शन आनंदा वडिगे (वय 31, रा. सर्व इनामधामणी) व सुकुमार रामचंद्र साळुंखे (वय 46, कळंबा, कोल्हापूर) यांना अटक केली आहे.

राजेंद्र वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार शशिकांत जाधव, राजेंद्र महादेव पोळ (वय 44, विश्रामबाग), रायबा तानाजी कोळी (वय 42), तेजस रायबा कोळी (वय 21, इनाम धामणी), उदय मोहन मलमे (वय 35, विधाता कॉलनी, विश्रामबाग), अरुण बाबुराव खोत (वय 55, उत्कर्षनगर कुपवाड) या सहा जणांना अटक केली आहे. सर्व संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंकली येथील हॉटेल सुयोग हे शशिकांत जाधव यांनी लिव्ह अँड लायसन्स कराराने राजेंद्र वाघमारे यांच्याकडून चालवण्यास घेतले आहे. हे हॉटेल पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राजेंद्र, योगेश, सुकुमार, काशीनाथ, दयासागर, विद्यासागर, बुर्ले व इतर साथीदार सोमवारी सकाळी हॉटेलमध्ये घुसले. दरम्यान व्यवस्थापक उदय मलमे व कामगार तेजस कोळी यांना मारहाण केली. मलमे यांच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रूपयांची सोनसाखळी पळवली. त्यामुळे जाधव यांनी तक्रार दिली .

त्यानुसार वाघमारे यांनीही फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, शशिकांत जाधव व जालिंदर ठोमके यांना हॉटेल चालवण्यास दिले होते. मुदत संपल्यानंतर ठोमके निघून गेला. परंतु जाधव याने हॉटेलचा ताबा देण्यास नकार दिला. तसेच भाडे देखील थकले आहेे. पतसंस्थेने याबाबत नोटीसही बजावली होती. (crime news)

कारवाई होईल म्हणून याबाबत विचारणा करण्यास गेल्यानंतर जाधव आणि इतरांनी भाडे देत नाही आणि हॉटेलची जागाही खाली करत नाही असे म्हणत चाकूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सुकुमार साळुंखे यांच्या गळ्यातील एक लाख 70 हजार रूपयांची सोनसाखळी काढून घेतली असे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांकडून वाहने, हत्यारांचा शोध

मारहाण प्रकरणात वापर झालेली चारचाकी आणि दुचाकी वाहने यांचाही शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू, काठी याचाही शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *