पी.एस.आय. पदी निवड झालेल्या सौ. आरती कांबळे यांचा गणपतराव पाटील यांच्या हस्ते सत्कार
शिरोळ/ प्रतिनिधी:
मौजे आगर तालुका शिरोळ येथील सौ. आरती महेंद्र कांबळे यांची नुकतीच पी.एस.आय. पदी निवड झाली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला.
सौ. आरती कांबळे यांचे माहेर धरणगुत्ती. अतिशय खडतर परिस्थितीमधे त्यांनी प्राथमिक शिक्षण धरणगुत्ती येथे घेतले. तर उच्च शिक्षण जयसिंगपूर येथे घेतले. जयसिंगपूर कॉलेज मधून त्यांनी बी.एससी. ही पदवी घेतली. त्यांचे वडील हे जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये काम करतात. सात वर्षांपूर्वी त्यांचे लग्न मौजे आगर येथील महेंद्र दिलीप कांबळे यांच्याशी झाले. एक मुलगी झाल्यानंतर कांबळे पती-पत्नीने पी.एस.आय. होण्यासाठी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी महेंद्र कांबळे यांची पी. एस. आय. पदी निवड झाली. दोन वर्षाच्या ट्रेनिंग नंतर ते आता सध्या पुणे येथे कार्यरत आहेत.
पती महेंद्र कांबळे यांच्यापाठोपाठ लगेच सौ. आरती कांबळे यांनीही पी.एस.आय. ची परीक्षा उत्तीर्ण केली. नाशिक येथे त्यांचे अकरा महिन्याचे ट्रेनिंग लवकरच सुरू होणार आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत सौ. आरती कांबळे यांनी पी. एस. आय. पदी झेप घेतल्याने मागासवर्गीय समाजातून आनंद व्यक्त केला जात आहे. उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सौ. आरती कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दत्तचे संचालक शेखर पाटील, अमोल चौगुले, विश्वास उर्फ दादा काळे, शिवगोंडा पाटील, राहुल मिस्त्री, हुसेन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.