शिरोळ : यड्रावात दोन गटांत तुंबळ हाणामारी
local news – शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे टेम्पो नेताना मंडप फाटल्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. दगड, विटा यांचा सर्रास वापर करीत खुर्च्यांची मोडतोड करण्यात आली.
यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. येथील रेणुकानगरमध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली.याप्रकरणी अरिफ नदाफ, शायरा नदाफ, लैला नदाफ यासह अनोळखी 10 ते 12 जणांविरोधात दशरथ श्रीपती शिंदे (वय 49, रा. रेणुकानगर, यड्राव) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे; तर दुसर्या गटाचे फिर्याद देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
दशरथ शिंदे, राकेश हेगडे, अनिकेत हेगदेव, सौरभ सोनुले, धोंडूबाई सोनुले, विद्या शिंदे, अजय शिंदे, छबुताई सोनुले अशी जखमींची नावे आहेत. त्यांना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. (local news )
रेणुकानगर येथे तक्रारदार व संशयित आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. दशरथ शिंदे यांच्या घरी देवीचा जागरणाचा कार्यक्रम होता. याकरिता त्यांनी दारात मंडप घातला होता. या मंडपातून मालवाहतूक आयशर टेम्पो जात असताना मंडप फाटल्याने चालकास काहींनी जाब विचारला.
यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान थोड्याच वेळात हाणामारीत झाले. दोन्ही गटांतील समर्थकांनी दगड व विटांसह हातात सापडेल ते एकमेकांच्या अंगावर भिरकावणयास सुरुवात केली. काहींनी खुर्च्यांची मोडतोडही केली. यामध्ये आठ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, शहापूर पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.