आष्टा : डंपर-दुचाकी धडकेत पिता-पुत्र जागीच ठार
(crime news) आष्टा-इस्लामपूर रस्त्यावर गोटखिंडी फाट्याजवळ मंगळवारी सकाळी 8.30 वाजता डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पिता-पुत्र जागीच ठार झाले. अंकुश शिवाजी साळुंखे (वय 37), त्यांचा मुलगा आदित्य (वय 11, रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा) अशी मृतांची नावे आहेत. तर मृताची पत्नी सोनाली (वय 30) गंभीर जखमी झाली. आष्टा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.
आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी 8.30 वाजता अंकुश साळुंखे हे आपल्या दुचाकी (क्र. एम. एच. 50 आर 1676) वरून पत्नी व मुलासमवेत आष्टा-इस्लामपूर रस्त्याने इस्लामपूरकडे निघाले होते. यावेळी गोटखिंडी फाट्याजवळ वळणावर इस्लामपूरहून आष्ट्याकडे निघालेला खडीने भरलेला भरधाव डंपर (क्र. एमएच 10 डीटी 0328) ने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. यामध्ये अंकुश साळुंखे व त्यांचा मुलगा आदित्य हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी सोनाली गंभीर जखमी झाल्या. (crime news)
ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत अंकुश आणि आदित्य साळुंखे यांची डोकी धडावेगळी झाली होती. दुचाकी अक्षरशः चक्काचूर झाली. घटनास्थळीचे चित्र अत्यंत विदारक होते. अपघाताची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी तातडीने मदतकार्य राबविले.
याबाबत अंकुश यांचा भाऊ महेशने आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी डंपरचालक रामनंदन कुंदनराज मेघवाल (रा.राजस्थान, सध्या रा. बेंदा कन्स्ट्रक्शन, नागाव रोड, आष्टा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून डंपर चालकास अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मनमित राऊत अधिक तपास करीत आहेत.