ग्रामविकास मंत्री मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या तारखेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरुच
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवस हा रामनवमी दिवशी साजरा केला जातो. मुश्रीफांचा जन्म हा रामनवमी दिवशी झालेला नाही, असा दावा भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केला होता . माझा जन्म रामनवमी दिवशी झाला होता, त्यामुळे याच दिवशी वाढदिवस झाला साजरा करतो, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले होते. यावरुन अद्याप आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. मुश्रीफ यांच्या जन्म दाखला, त्यांच्या आधार कार्डवरील जन्मतारखेची पडताळणी करा, असे आव्हान कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी समरजितसिंह घाटगे यांना केला आहे. तर पाचवीचा वर्गच नसलेल्या शाळेत मुश्रीफ यांचे नाव कसे आले, असा सवाल समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये जन्मतारखेच्या नोंदीमधील तफावत असून पॅनकार्ड आणि शाळेचा दाखला यांच्यामध्ये जन्मतारखा वेगवेगळ्या आहेत. ज्या शाळेला पाचवीचा वर्ग नव्हता, अशा शाळेमध्ये पाचवीमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता खोटे आणि बनावट दाखलेही शोधावे लागतील, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला आहे.
हिंदुराव घाटगे शाळेमध्ये ना. मुश्रीफ यांचा हसन साहेब असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर जन्माला आले त्याच वेळेला हसन साहेब असे नाव कसे? कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी शाळा दाखला तयार केला आहे. 1953 चा जन्म दाखला गृहित धरला तर आठव्या वर्षी पाचवीमध्ये होते तर पहिलीमध्ये त्यांचे वय किती? असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ना. मुश्रीफ यांचे ओरिजनल दाखले नसल्यामुळे सध्या चुकीची कागदपत्रे तयार केली जात आहेत. त्यामुळे ते अडचणीत येत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुश्रीफ यांचा जन्म दाखला, ‘आधार’ची पडताळणी करा : गाडेकर यांचे आव्हान
समरजितसिंह घाटगे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना विश्रांती आणि औषधोपचाराची गरज असल्याची टीका माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी केली. ना. हसन मुश्रीफ यांच्या जन्म दाखला, आधार कार्ड, हिंदू पंचांग या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आव्हानही त्यांनी दिले.
गाडेकर म्हणाले, 23 मार्च 1953 रोजी रामनवमी होती, त्या रात्री मंत्री मुश्रीफ यांचा जन्म झाला. दुसर्या दिवशी 24 मार्च 1953 रोजी जन्म नोंद झाली. हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेमध्ये 1958 मध्ये पहिलीच्या वर्गात दाखल झाले. त्यानंतर अनुक्रमे दुसरी 1959 मध्ये तर 1964 ते 65 या शैक्षणिक वर्षांमध्ये ते सातवी उत्तीर्ण झाले. शेवटी विजय सत्याचाच होतो.
मुश्रीफ यांच्या लौकिकाची त्यांना असुया निर्माण झाली असून मुश्रीफ यांनी मंत्रिपदाच्या अडीच वर्षांमध्ये संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. कोट्यवधीचा निधी मतदारसंघात आणून विकासकामे केली आहेत. आगामी काळात उर्वरित कामेही मार्गी लागतील. मतदारसंघात महाविकास आघाडीच्या निमित्ताने सर्व नेते मंडळी एकत्र येऊन सुरू असलेले एकोप्याचे दर्शन यामुळे समरजित घाटगे वैफल्यग्रस्त झाले आहेत. ते विधानसभेच्या निवडणुकीनंतर बेपत्ता होते, असेही ते म्हणाले.
गोकुळच्या संचालकांनी दिलेल्या जाहिरातमध्ये ना. मुश्रीफ यांचा काहीही संबंध नसताना समरजितसिंह घाटगे पोलिस ठाण्यात जाऊन बसले. रामनवमीला मुश्रीफ यांचा जन्म झाला. त्यांच्या वाढदिवसाला स्व. विक्रमसिंह घाटगे आणि स्वतः समरजितसिंह घाटगे यांनीही यापूर्वी शुभेच्छा दिल्या. मग आत्ताच त्यांना कुठून सुचले? त्यांचे चुलते प्रवीणसिंह घाटगे यांची एकसदस्य समिती नियुक्त करण्यात यावी, अशी मागणीही गाडेकर यांनी केली.