अ‍ॅड. सदावर्तेंना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

मराठा समाजाविषयी अवमानकारक वक्तव्ये (controvercial statement) केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झालेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. पी. गायकवाड यांनी सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शाहूपुरी पोलिसांनी मुंबईतून सदावर्तेंचा ताबा घेतल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील, फिर्यादीचे वकील यांच्यासह अ‍ॅड. सदावर्ते यांनीही स्वत:ची बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एक तासाहून अधिक वेळ चालला.

कोल्हापूरचे सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून शाहूपुरी पोलिसांनी बुधवारी गिरगाव न्यायालयाकडून अ‍ॅड. सदावर्ते यांचा ताबा मिळवला. आर्थर रोड जेलमधून त्यांना घेऊन हे पथक मध्यरात्री तीनच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचले.

एक तासाहून अधिक वेळ युक्तिवाद

साडेअकराच्या सुमारास अ‍ॅड. सदावर्ते यांना न्यायालयासमोर उभा करण्यात आले. सुरुवातीला तपास अधिकारी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी फिर्यादीतील मुद्दे न्यायालयासमोर मांडले. अ‍ॅड. सदावर्ते यांची वक्तव्ये मराठा समाजात तेढ निर्माण करणारी असून, यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे कोण, कोण आहेत याचा तपास करणे, त्यांच्या व्हायरल भाषणांची खातरजमा करण्यासाठी आवाजाचे नमुने घेणे यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी गवळी यांनी केली.

अ‍ॅड. सदावर्ते यांनी केलेली वक्तव्ये (controvercial statement) अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, त्यामुळे मराठा समाज आणि इतर समाजांमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. गेले काही दिवस ते वारंवार अशी वादग्रस्त विधाने करत आहेत. यामागील सूत्रधार शोधण्यासाठी त्यांच्याकडे चौकशी करणेे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील आम—पाली कस्तुरे यांनी केला.

मराठा समाजाकडून 60 वकिलांचे वकीलपत्र

अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात सकल मराठा मोर्चाच्या वतीने दिलीप पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या वतीने अ‍ॅड. शिवाजीराव राणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यासोबतच यावेळी 60 हून अधिक वकिलांच्या सहीचे वकीलपत्र मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *