नांदणीत महिनाभरात साकारेल ‘हा’ प्रकल्प
(local news) पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी गावागावांत जनजागृती आणि ठोस उपाययोजनांवर भर दिला जात आहे. यात सामाजिक संस्था आणि उद्योगपतीही मागे राहिलेले नाहीत. पंचगंगेला प्रदूषणाच्या जोखडातून मुक्त करून तिला निर्मळ बनविण्यासाठी हातात हात घालून ठोस कृतींवर भर दिला जात आहे. नांदणी (ता. शिरोळ) गावातील सांडपाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करून शेती आणि वनराई फुलविण्यात येईल. यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूर यांनी पुढाकार घेतला आहे.
सीएसआर फंड आणि लोकवर्गणीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महिनाभरात साकारत आहे. जलशक्ती मंत्रालयाची मान्यता असलेल्या एफ. बी. टेक टेक्नॉलॉजीच्या अत्याधुनिक यंत्रणेमार्फत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. शेती आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे नांदणीचा आठ-दहा वर्षांत विस्तार वाढला. सुमारे वीस हजार लोकसंख्येच्या या गावात रोज दोन लाख लिटरपर्यंत सांडपाणी सहा ठिकाणी एकत्रित होते. हजारो लिटर पाणी थेट नदीत मिसळते.
पंचगंगा काठावर मोठे गाव म्हणून रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकल्पासाठी या गावाची निवड केली. उद्योगपती विनोद घोडावत, उद्योगपती राजेंद्र मालू, ॲड. किशोर लुल्ला (सांगली) यांच्यासह रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने प्रकल्पाची जबाबदारी घेतली आहे. रोटरी ग्रीन सिटीचा गावाशी संबंध नसताना नांदणीच्या ग्रामस्थांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि पंचगंगा निर्मळ बनवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला.
नांदणीतील हा प्रकल्प दृष्टिपथात आला असून रोटरी ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड, रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष दादासो चौगुले, सेक्रेटरी अविनाश पट्टणकुडे, खजिनदार हर्षवर्धन फडणीस, सदस्य नंदकुमार बलदवा, अन्सार चौगुले, विमल रुणवाल, टी. बी. पाटील, शंकर बजाज, सुदर्शन कदम, डॉ. अशोकराव माने यांच्यासह नांदणी ग्रामपंचायतीचे योगदान मिळत आहे. (local news)
सव्वा लाख हजार लिटर शुद्ध पाणी मिळणार
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूर यांच्यातर्फे ६० लाख खर्चाचा हा प्रकल्प आहे. सीएसआर फंड आणि लोकवर्गणीतून हा प्रकल्प महिनाभरात साकारेल. यातून रोज एक लाख ६० हजार लिटर सांडपाण्यावर अत्याधुनिक मशिनरींच्या माध्यमातून प्रक्रिया करून सव्वा लाख हजार लिटर शुद्ध पाणी वापरास मिळणार आहे. उर्वरित पाण्यातील गाळाचा वापर खतनिर्मितीसाठी होईल.
स्थानिक दानशूरांचेही योगदान हवेच
नांदणीतील हा प्रकल्प पंचगंगा काठावरील गावांसाठी दिशादर्शक असून, यासाठी गावातील उद्योजक, बँका, शेतकरी आणि ग्रामस्थांचे योगदान लाभणे आवश्यक आहे.
शिरोळ तालुक्यात कर्करोग रुग्णांची संख्या अधिक आहे. भविष्यात हे प्रमाण वाढू शकते. पंचगंगा स्वच्छ व निर्मळ झाली, तरच कर्करोगग्रस्तांचे प्रमाण कमी होईल. हे ओळखून नांदणीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, लोकवर्गणीतील ५० टक्के आर्थिक भार उचलला आहे. सर्वांच्या प्रयत्नातून पंचगंगा प्रदूषणमुक्त श्वास घेऊ शकेल.
– विनोद घोडावत, उद्योगपती