हेरवाड आणि माणगाव ग्रामपंचायतींसाठी मोठी घोषणा
नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आठ कोटी रुपयांचा निधी (funding) टप्याटप्याने देण्याची घोषणा सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आज येथे केली. हेरवाड, माणगाव ग्रामपंचायतीला प्रत्येकी १५ लाखांच्या निधीची घोषणा करीत तृतीयपंथी व्यक्तींसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनातर्फे झालेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी कृतज्ञता पर्वाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला. श्री. कदम म्हणाले, ‘‘सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळ स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे आठ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तो टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येईल. स्मारकाच्या सुशोभीकरणाचे काम त्यातून केले जाईल. विधवा प्रथाबंदीचा क्रांतिकारी निर्णय घेऊन हेरवाड आणि माणगावने राज्यासमोर आदर्श निर्माण केल्याने दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखांचा निधी (funding) मंजूर करण्यात येत आहे.’’
‘‘राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा जागर करताना शाहू मिलच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. त्यासाठी येत्या आठ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेणार आहोत. मिलच्या नियोजित आराखड्याला मंजुरी घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाणार आहे.’’
– सतेज पाटील, पालकमंत्री.