शिरोळ तालुक्यातील नागरिकांना आतापासून धास्ती
शिरोळ तालुका पावसाची कमी, पण पुराची हमी देणारा तालुका. सन 2005, 2019, 2021 मध्ये आलेल्या महापुरांमुळे (flood) शिरोळ तालुक्याचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा तोंडावर पावसाळा आल्याने शिरोळ तालुक्यातील गावांवर महापुराची टांगती तलवार उभी आहे. तालुका प्रशासनाने महापूर आल्यास संभाव्य उपाययोजनांचे नियोजन केले आहे. असे असले तरी मागील आलेल्या महापुराच्या काळात नेत्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. शिवाय अनुदान वाटपात अनेकांना मदत न मिळाल्याने तालुक्यातून मोठे मोर्चे निघाले होते. त्यामुळे संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी मागीलप्रमाणे त्रुटी राहू नयेत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
शिरोळ तालुक्यात 52 गावे व 3 शहरांचा समावेश आहे. यातील 43 गावे महापुराच्या विळख्यात सापडतात. 2010 पासून ते 2021 पर्यंत 2019 मध्ये सर्वाधिक 839.57 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या चार नद्या असल्याने पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा (flood) सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो. अशातच कर्नाटक सरकारकडून नव्या पुलांचे बांधकाम मोठ-मोठे भराव टाकून सुरू आहे. या पुलांच्या भरावामुळेच शिरोळ तालुक्यातील पाणी ओसरत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. आतापर्यंत महापुराच्या काळात लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनांपैकी अद्याप एकही पूर्ण झालेले नाही. त्यामुळेच शिरोळ तालुक्यातील नागरिकांना संभाव्य महापुराची आतापासून धास्ती आहे.
सर्वच घोषणा हवेत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह अनेक आजी-माजी मंत्र्यांनी शिरोळमध्ये महापूर आल्यानंतर पाहणी दौरा केला. या दौर्यात नदीजोड प्रकल्प राबविणार, नदीकाठची गावे स्थलांतरित करणार, पूरग्रस्तांसाठी शासकीय सभागृह उभारणार, महापूर येऊ नये म्हणून ठोस उपाययोजना करणार, पूरग्रस्तांना योग्य भरपाई देणार, अशी अनेक घोषणा केल्या, पण त्या हवेत विरल्या आहेत.
शिरोळ तालुका दृष्टिक्षेपात
लोकसंख्या 3,99,921
ग्रामीण लोकसंख्या 3,21,466
पूरबाधित लोकसंख्या 93,910
पूरबाधित कुटुंबे 18,576
पूरबाधित गावांची संख्या 41
आरोग्य पथके 15
आरोग्य पथकांतील कर्मचारी 105
पूर छावण्यांतील स्वयंसेवक 41
संभाव्य गरोदर माता 1033
एकूण खासगी वैद्यकीय डॉक्टर 221
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र हेक्टर 50,783
बुडीत क्षेत्र हेक्टर 23,000