सांगली : मुलाकडून बापाचा खून कोयत्याने केले वार

मुलाने जन्मदात्या बापाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कुरळप (ता. वाळवा) येथे घडली. सुरेश भीमराव पाटील (वय 45, रा. वशी) असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा प्रथमेश सुरेश पाटील (वय 23, रा. वशी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुरेश पाटील यांना दारूचे व्यसन होते. त्या व्यसनापायी ते मिळेल ते काम करीत असत. दरम्यान, मंगळवारी कुरळप येथील गाव कमानीलगत असणार्‍या कट्ट्यावर सुरेश पाटील दारूच्या नशेत बसले असताना मुलगा प्रथमेश याने धारधार कोयत्याने त्यांच्या मानेवर जोरदार वार केला. त्यांची मान तुटली. लगेचच दुसरा वार तोंडावर केला. यामध्ये त्याचा जबडा पूर्णपणे तुटला होता.रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी अवस्थेत सुरेश पाटील यांना कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेे. परंतु उपचारापूर्वीच सुरेश पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी मुलाला लगेचच ताब्यात घेतले. या हल्ल्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिस उपअधीक्षक पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली.मुलाने बापाचा खून केल्याची बातमी वार्‍यासारखी कुरळप व वशी गावात पसरली घटमनास्थळावरून ते आरोग्य केंद्रापर्यंत बघ्यांची गर्दी होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव तपास करीत आहेत.

अर्धा तास जखमी आरोग्य केंद्रात…

सुमारे अर्ध्या तास सुरेश पाटील जखमी अवस्थेत आरोग्य केंद्रात पडून होते. वैद्यकीय अधिकारी नुकतेच निघून गेले होते. ते परत येईपर्यंत सुरेश पाटील तळमळत पडले होते. डॉ. चौगुले यांनी त्याची पाहणी करून त्यांना पुढे उपचारासाठी पाठविले. खूप वेळ वाट पाहूनही 108 ची गाडी उपलब्ध न झाल्याने खासगी वाहनाने जखमी सुरेश पाटील यांना खासगली रूग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *