शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये शासनमान्य सुविधा केंद्र सुरु
शिरोळ/प्रतिनिधी:
शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासनाचे सुविधा केंद्र (एफ. सी.) सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि सुविधा केंद्राचे समन्वयक एस. एम. कुलकर्णी यांनी दिली.
यावर्षी दहावीच्या निकालापूर्वीच अभियांत्रिकी डिप्लोमा (पॉलिटेक्निक) प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी दहावीच्या गुणपत्रिकेची आवश्यकता नाही. विद्यार्थी (student) स्वत: अथवा सुविधा केंद्रावर आपला प्रवेश अर्ज भरु शकतो. तसेच कागदपत्रांची छाननीही करु शकतो.
अर्ज दाखल करणे, कागदपत्रांची पडताळणी व त्याची निश्चिती करण्याची मुदत ३० जून पर्यंत आहे. त्यानंतर ३ जुलै ला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. ४ ते ६ जुलै दरम्यान गुणवत्ता यादीमध्ये तक्रार करण्यास मुदत असेल. ७ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहिर होणार आहे.
सुविधा केंद्रावर विद्यार्थ्यांना (student) अर्ज दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन व अर्ज भरुन देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी शिरोळ येथील श्री दत्त पॉलिटेक्निकमधील सुविधा केंद्रास भेट देवून आपला अर्ज दाखल करण्याचे आवाहन ट्रस्टचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील आणि प्राचार्य पी. आर. पाटील यांनी केले आहे.