कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेपासून 90 टक्के शेतकरी अपात्र : राजू शेट्टी
नियमित कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीचे निकष जाचक आहेत. यामुळे जिल्ह्यातील 90 टक्के शेतकरी अपात्र ठरणार आहेत. ही शेतकर्यांची चेष्टाच आहे, येत्या तीन दिवसांत हे निकष बदला अन्यथा 13 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी जे निकष जाहीर केले आहेत, यामध्ये 2017-18, 2018-19 व 2019-20 या कालावधीत बँक अथवा संस्थेकडून घेतलेले कर्ज पात्र असेल. कोल्हापूर, सांगली, सातार्यासह 13 जिल्ह्यात 2019 मधील पूरस्थितीत पीक कर्ज आणि त्यावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांना दुबार लाभ दिला जाऊ नये, या दोन निकषांमुळे जिल्ह्यातील सुमारे 90 टक्के शेतकरी अपात्र ठरणार आहेत.जिल्ह्यातील नियमित कर्ज फेडणार्या 1 लाख 59 हजार 770 शेतकर्यांना सुमारे 953 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, यापैकी केवळ 17 हजार 543 शेतकर्यांना 104 कोटी रुपयांचा लाभ होईल. उर्वरित सुमारे 90 टक्के शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. नियमित कर्ज फेड करणार्या शेतकर्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत सवलत दिली जाते. त्याची यादी तयार आहेच. ती यादी प्रोत्साहन अनुदानासाठी ग्राह्य धरावी, अशी मागणीही त्यांनी केली.यापूर्वीच्या सरकारने कर्जमाफी योजनेवरील टीकेनंतर 16 वेळा शुद्धिपत्रके काढली. यानंतर कर्जमाफी देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी अतिनिकष लावले होते. आम्ही सरसकट लाभ देत असल्याचे म्हटले होते. शेतकर्यांची नस अन् नस माहीत असलेल्यांनी जाचक निकष लावून शेतकर्यांची चेष्टा का केली? खरोखरच निकष लावायची गरज होती का, असा सवाल शेट्टी यांनी केला.
जिल्ह्यात उसासाठी जे पीक कर्ज घेतले जाते, त्याला 15 महिन्यांची मुदत असते. त्यामुळे सगल तीन वर्षांच्या निकषात हे शेतकरी बसत नाहीत. हे निकष आम्ही मान्य करणार नाही. या योजनेसाठी 10 हजार कोटींची तरतूद केली आहे, त्याला कात्री लावू देणार नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
आमदारांनी लपणे, हा मतदारांचा अपमान : शेट्टी
तीन लाख मतदारांचे आपण प्रतिनिधित्व करतो, कायदे करण्यासाठी विधिमंडळात जातो; पण कायदे करणारेच लपून बसले. हा मतदारांचा अपमानच आहे, अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली. जे बोलायचे आहे ते समोर येऊन, बेधडक बोला, असा सल्लाही त्यांनी दिला. पक्ष उभारणीसाठी काय खस्ता खाव्या लागतात, हे पक्षप्रमुखालाच माहीत असते. एकेक कार्यकर्ता शोधावा लागतो. त्याला घडवावे लागते. तुम्ही पळून जाताय, घाबरून बसताय हा काय प्रकार, असेही शेट्टी म्हणाले.