दत्तवाड येथे शाश्वत ऊस उत्पादनासाठी शेतकरी मेळावा उत्साहात
शिरोळ/प्रतिनिधी:
(local news) दत्तवाड शाश्वत ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागतीपासून सेंद्रिय कर्ब, लागण पद्धत बरोबर ऊस वाढीच्या दृष्टिकोनातून समतोल आहारामध्ये रासायनिक व जैविक खते वापरण्याची पद्धत सांगून आळवणी, फवारणी व फवारणीतून देण्यात येणारी आधुनिक खते याबरोबरच पाचट कसे ठेवावे याबाबत सखोल मार्गदर्शन डॉ. निलेश मालेकर यांनी केले. ते दत्तवाड तालुका शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुबेर कमते होते.
श्री दत्तचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड येथे कारखान्यामार्फत शाश्वत ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व, मधुमक्षिका पालन, व्यवस्थापन तसेच ऊस शेती मधील फवारणीसाठी ड्रोनचा वापर व नॅनो युरियाचे महत्व या विषयी मेळावा घेण्यात आला. यावेळी सौ. तेजा घोरपडे यांनी मधुमक्षिका पालन व मध उत्पादन याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली. तर राहुल मगदूम यांनी औषधे व खते फवारणीसाठी ड्रोनचा वापर याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अरुण देसाई प्रमुख उपस्थित होते. दत्तवाड आणि परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी मनोगतातून चेअरमन गणपतराव पाटील यांचे कौतुक केले. (local news)
या प्रसंगी स्वागत सुरेश पाटील, प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी केले. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, अशोक पाटील , बबन मोटे, संजय मलिकवाडे, मलगोंडा पाटील, विरूपाक्ष हेरवाडे, राजू पाटील, चंद्रशेखर कलगी, संजय पाटील, जिवंधर हेमगीरे यांच्यासह कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी मानले.