श्री क्षेत्र नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज (मंगळवारी) पहाटे ३ वाजता दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णानदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादूकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिणद्वारादून बाहेर पडले. यावेळी कृष्णा नदीत स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती.नृसिंहवाडी येथे कृष्णा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. यावेळी उत्तरेकडून वाहणारे पाणी श्रींच्या स्वयंभू चरण कमलावरून दक्षिण द्वारातून बाहेर पडते. यावेळी शेकडो भाविक चरण कमलावरील कृष्णामाईच्या पाण्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेऊन कृतार्थ होतात, यालाच दक्षिण द्वार सोहळा म्हटले जाते. आज पहाटे हा दक्षिण द्वार सोहळा पार पडला. मंदिरातील देव परमपूज्य नारायण स्वामी यांच्या मंदिरात आणण्यात आले. आजपासून मुख्य दत्त मंदिरात होणारी महापूजा तसेच अन्य कार्यक्रम श्रींच्या उत्सव मूर्तीवर होणार आहेत. नित्य श्रींच्या उत्सव मूर्तीची आकर्षक फुलमाळांची सजावट सेवेकरी संजय रुके पुजारी यांच्याकडून केली जाणार आहे. पहाटे काकड आरतीपासून शेजारती पर्यंत सर्व देवस्थानचे नित्य कार्यक्रम पूज्य नारायण स्वामी महाराज यांच्या मंदिरातच पार पडणार आहेत. रोज रात्री साडेसात नंतर धूपाआरती तसेच येथील ब्रह्मवृंदांकडून कृष्णा नदीची पूजा व इंदुकोटी स्तोत्रांचे पठण केले जाणार आहे. उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त येथे विविध उत्सव साजरे केले जाणार आहेत. दरम्यान, दत्त मंदिर पाण्याखाली गेल्याने देवस्थान समितीकडून सर्व साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच अन्नछत्रातील भाविकांसाठी मिळणारा महाप्रसाद नदीचे पाणी वर येईपर्यंत सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *