श्री दत्त भांडारच्या ग्राहकांना विमा पॉलिसीचे वितरण
शिरोळ/ प्रतिनिधी:
श्री दत्त उद्योग समूहाचे आधारस्तंभ व श्री दत्त भांडारचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या व्यवसाय वृद्धीच्या संकल्पनेतून ग्राहकांसाठी विमा संरक्षण योजना जाहीर केली होती. यानुसार विमा कंपनीकडून प्राप्त झालेल्या पॉलिसीचे वितरण मान्यवरांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले.
या योजनेमुळे संस्थेकडील व्यवहारात ५० लाख रुपयांनी वाढ झाली असून ३१ मार्च २०२२ अखेर १० कोटी ६० लाखाची उलाढाल झाली आहे. संस्थेकडील व्यवसाय वृद्धीत सातत्याने वाढ होण्यासाठी नवनवीन योजना व प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन दामोदर सुतार यांनी यावेळी दिली.
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या संकल्पनेतून श्री दत्त भांडारचे १० हजार स्क्वेअर फुट इमारतीचे अद्ययावत नूतनीकरण करून १ जुलै २०२१ पासून ग्राहक सेवेत दाखल केले होते. संस्थेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक यांनी ही अद्ययावत वास्तू पहावी, अनुभवावी व व्यवसायवृद्धीच्या संकल्पनेतून ग्राहकांसाठी स्टार हेल्थ अँड अलायन्स इन्शुरन्स कंपनी लिमिटेड चेन्नई यांच्या सहकार्याने १ ऑगस्ट २०२१ पासून ग्राहक विमा संरक्षण योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार संपूर्ण वर्षात ६० हजार रुपये पर्यंतच्या माल खरेदीवर १ लाखाचा अपघाती विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे एका वर्षात ८० ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरले. विमा कंपनीकडून प्राप्त झालेल्या पॉलिसीनुसार पहिल्या सात ग्राहकांना विमा पॉलिसीचे वितरण उद्यानपंडित गणपतराव पाटील, श्री दत्त साखर कारखान्याचे कायदा सल्लागार एडवोकेट शिवाजीराव चव्हाण, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, एडवोकेट खान मॅडम या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्राहक म्हणून माजी नगरसेवक विठ्ठल सूर्यकांत पाटील, सौ. सुप्रिया चंद्रकांत कांबळे, श्रीमती नंदा रमेश शिंगे, सौ. आश्लेषा सचिन खांडेकर, इस्माईल अब्बास चौगुले, महेश पांडुरंग पाटील -कोल्हापूर, प्रसाद गोरखनाथ वाघमोडे -जयसिंगपूर यांना पॉलिसीचे वितरण करण्यात आले. यावेळी जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे यांच्यासह ऑफिस सेवक वृंद उपस्थित होते.