हेरवाड येथील दुसरा ऐतिहासिक निर्णय; उचलले क्रांतिकारी पाऊल
पतीचे निधन झाल्यानंतर विधवेच्या उदरनिर्वाहासाठी 25 हजारांची आर्थिक मदत देण्याचा दुसरा ऐतिहासिक निर्णय हेरवाड (ता. शिरोळ) येथील माळी समाजाने घेऊन क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. माळी समाजाच्या या आदर्शवत निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे. हेरवाड ग्रामपंचायतीत विधवा प्रथा बंदीचा ठराव केल्यानंतर संपूर्ण राज्यात या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींना लागू केला. या आदेशाचे सर्वांनी स्वागतही केले.
हेरवाड येथील समस्त माळी समाजाने संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बोलाविलेल्या बैठकीत विधवा प्रथा बंदी समाजाने अमलात आणली आहेच. दुर्दैवाने पतीचे निधन झाल्यास पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी 25 हजार रुपये अनुदान (grant ) देण्याचा ठराव संमत करण्यात आला. तसे पत्रही ग्रामपंचायतीला देण्यात आले. इतकेच नव्हे तर समाजातील अनेक बांधवांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा ठराव करत नावनोंदणीही केली. या बैठकीत सुनील माळी, बाबुराव माळी, बाळासो माळी, अशोक माळी, खंडू कावरे, बजरंग माळी, दिलीप माळी आदी समाजबांधव उपस्थित होते.
कौतुकास्पद निर्णय
विधवा प्रथा बंदीची क्रांतिकारी मशाल हेरवाड येथून पेटविण्यात आली. राज्य शासनाने याची दखल घेतली असून, आज राज्यात त्याची अंमलबजावणी होताना दिसत आहे. अशातच माळी समाजाने विधवा महिलांना 25 हजारांचे अनुदान (grant ) देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे, असे सरपंच सुरगोंड पाटील यांनी सांगितले.
संबंधित बातम्या