राग, द्वेष, मत्सर, व्यसनाची जाळून राख करा, प्रेम, माया, बंधुत्वाचा स्वीकार करा : बी. के.मनीषा बहेनजी
शिरोळ /प्रतिनिधी:
राग, द्वेष, मत्सर, व्यसनासह अन्य विकाराची जाळून राख करा व बंधुत्व, प्रेम, माया, ममता याचा स्वीकार करा, तरच राखी पौर्णिमा (festival) साजरी केल्याचे सार्थक होईल, असे मौलिक विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा शिरोळच्या प्रमुख बी. के.मनीषा बहेनजी यांनी व्यक्त केले.
येथील विश्वविद्यालय शाखेच्यावतीने पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना राखी पौर्णिमा निमित्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. नुसते बहिणीने भावास राखी बांधली म्हणजे रक्षण करणे एवढाच अर्थ न काढता देशप्रेमाबरोबरच जात, पात, धर्म, पंथ न पाहता ही राखी पौर्णिमा (festival) साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शिरोळ तालुका श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब माळी यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार मनीषा बहेनजी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शिरोळ शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डी. आर. पाटील, संजय सुतार, निनाद मिरजे, संतोष बिडवे यांच्यासह संजय चव्हाण, बाबासाहेब पाटील नरदेकर, गुरुदत्त देसाई, जयसिंग माने, हाजी लियाकत सय्यद, रमेश पाटील यांना राखी बांधण्यात आल्या. या कार्यक्रमास तात्यासाहेब माने, शिवाजी गावडे, हरी कोरे, अर्चना बहेनजी, सुलोचना बहेनजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.