गुन्हेगारी घटनांनी कडेगाव तालुका हादरला
(crime news) गेल्या दहा दिवसांत खून, बलात्कार, मंदिरातील चोरी तसेच हाणामारी व फसवणूक या घटनांनी कडेगाव तालुका हादरला आहे. यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्याचा क्राईम रेट हा कायमच कमी राहिला आहे. त्यामुळे शांतताप्रिय अशीच तालुक्याची ओळख आहे. परंतु तालुक्यातील नुकतेच शिवाजीनगर येथे निर्दयी बापाने अडीच वर्षाच्या चिमुकल्या बालकाचा खून केला. याचबरोबर कडेगाव येथे घरी कोणी नसल्याचे पाहून अल्पवयीन मुलीवर नराधमाने बलात्कार केला. तसेच हिंगणगाव बुद्रुक येथे मोबाईलवरील आक्षेपार्ह मेसेजच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत चौघे गंभीर जखमी झाले. यामध्ये 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याचबरोबर वडियेरायबाग येथे मूळ मालकाचे बनावट आधार कार्ड तयार करून परस्पर चारचाकी गाडीची विक्री करून एकाची 3 लाख 50 हजारांची फसवणूक झाली. तसेच कडेगाव येथील दत्त मंदिरात दानपेटीच चोरांनी लंपास केली. या घटनांनी तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर येथील बालकाच्या खून प्रकरणाबाबत तालुक्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतीतही सर्वसामान्यांच्या मनामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गंभीर गुन्हेगारी घटनांचे सत्र तालुक्यात सुरू असताना येथील सत्ताधारी, विरोधीपक्ष व विविध संघटनांनी घेतलेली बघ्याची भूमिका
ही खेदजनक असल्याची चर्चा सामान्य लोकांत आहे. नेते व प्रशासनाने तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी राहील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. (crime news)
कायद्याचा वचक राहणे गरजेचे
सध्या तालुक्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान गुन्ह्यात दुर्लक्ष केल्याचा परिणामही काहीवेळा दिसून येतो. परिणामी भुरटे, चोर, गुंड लोक मोठ्या गुन्ह्याकडे वळतात. त्यामुळे कायद्याचा वचक राहणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सामान्यांतून व्यक्त केली जात आहे.