भावाचा मोबाईल हॅक करून नातेवाईकांना पाठवले बहिणीविषयी मेसेज…

भावाचा मोबाइल हॅक करून नातेवाईकांना बहिणी विषयी बदनामीकारक संदेश पाठवून बहिणीची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार परभणी शहरात घडला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

परभणी शहरातील खानापूर फाटा परिसरात राहणाऱ्या एका युवकाचा मोबाइल अज्ञात आरोपीनी हॅक केला. त्यानंतर सदरील युवकाच्या इन्स्टाग्रामवरून त्याच्या वीस वर्षीय बहिणीविषयी नातेवाईकांना बदनामीकारक संदेश पाठवले. आरोपी यावरच थांबला नाही तर स्वतः मुलीला देखील इंस्टाग्रामवर बदनामीकारक संदेश पाठवले. हा धक्कादायक प्रकार नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात विरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी जिंतूर शहरामध्ये एका शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांचे फोटो मार्फ करून ते व्हाट्सअॅपवर टाकून बदनामी केल्याचा प्रकार घडला होता. त्यात आता चक्क भावाचा मोबाइल हॅक करून बहिणीची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मोबाइलचा वापर करताना जरा जपूनच असे म्हणण्याची वेळ आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *