इंद्रधनुष्य मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
शिरोळ/ प्रतिनिधी:
मानवी मेंदूचे वैचारिक शुद्धीकरण झाल्याखेरीज सुदृढ समाज निर्मिती होणार नाही. त्यासाठी सकस साहित्य आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी केले. मासिक इंद्रधनुष्य दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील हे होते.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, भारतामध्ये दिवाळी अंकाची परंपरा अलौकिक आहे. दिवाळी अंकामुळे अनेक साहित्यिकांना, नवोदित लेखकांना, कवींना समाज प्रबोधनाचे माध्यम मिळत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजाला नवी दिशा आणि नव समाज निर्मितीसाठी साहित्याची गरज आहे. ही गरज ओळखून ‘इंद्रधनुष्य’ मासिकाने ही परंपरा टिकवण्याचे काम केले आहे. समाजाला काय हवे आहे ते उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी नेमके जाणले आहे. सामाजिक बांधिलकीचा डंका सर्वजण पिटतात, मात्र बांधिलकी बरोबर आता सामीलकी महत्त्वाची आहे. तरच हा समाज जीवनाचा रथ पुढे जाणार आहे असेही कुलकर्णी यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, सहकार महर्षी, स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे. ती शिदोरी घेऊन आम्ही वाटचाल करीत आहोत. मासिक इंद्रधनुष्य मधून वेगवेगळ्या विषयांचे साहित्य वाचकांच्या समोर ठेवून जनजागृती आणि प्रबोधन करण्याचा आमचा मानस कायम राहणार आहे. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी दत्त उद्योग समूह या परिसरात आपले योगदान कायम देत राहील अशी ग्वाही पाटील यांनी यांनी दिली.
यावेळी प्रा. अशोक दास, दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार, प्रकाश देसाई सर, राजेंद्र प्रधान, इकबाल इनामदार यांनीही मासिक इंद्रधनुष्यचे कौतुक केले.
प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी संपादक प्रा. मोहन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सहसंपादक संजय सुतार यांनी केले. आभार नीलम माणगावे यांनी मानले. यावेळी सामाजिक, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.