खंडनाळ येथे पडक्या घरातील गांजा लागवडीवर छापा
खंडनाळ (ता. जत) तेथे एका पडक्या घरात गांजाच्या (marijuana) झाडाची लागवड केलेल्या ठिकाणी छापा टाकला आहे. बेकायदेशीर गांजा लागवड केल्याप्रकरणी हरिबा आप्पा कुलाळ (वय ७२, रा. कुलाळवाडी ता. जत) या संशयित आरोपीस अटक करून त्याच्याकडून ६६ हजार ५२० रुपये किमतीचा ओला गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी केली आहे.
पडक्या घरात गांज्याची लागवड
याबाबत अधिक माहिती अशी, खंडनाळ येथे एका पडक्या घरात गांजाची लागवड हरिबा कुलाळ यांनी केली आहे. प्रकाश हरी रामगडे यांनी पोलिसात संशयित आरोपी हरिबा कुलाळ यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी छापा टाकला असता पोलिसांना सात ते आठ उंचीचे लहान मोठी १२ गांजाची झाडे मिळाली. या गांजाचे (marijuana) वजन केले असता साडेसहा किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी सदरचा गांजा जप्त केला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांनी गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अमली पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ व २२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली आहे. आरोपीस अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.