सांगलीतील व्यापार्‍याचा शिरवळमध्ये संशयास्पद मृत्यू

पुणे महामार्गावरील शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथील नीरा नदीच्या पात्रात सांगलीतील व्यापारी सौमित सुमेध शाह (वय 23, रा. पटेल चौक, सांगली) यांचा मृतदेह आढळला. दरम्यान, हा संशयास्पद मृत्यू असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. त्यानुसार आता शिरवळ पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

या घटनेबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सौमित हा व्यवसायानिमित्त आपल्या मित्रांसोबत शनिवारी पुण्याला कारने गेला होता. यावेळी पुणे येथे आपल्या मित्रांना तेथेच सोडून अर्ध्या तासात परत येतो, असे सांगून तो तेथून निघाला. रात्री तो शिवापूरचा टोलनाका ओलांडून पुढे आला. यावेळी तो कारमध्ये एकटाच असल्याचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आल्याचे पोलिस नवनाथ मदने यांनी सांगितले.

रविवारी सकाळी नीरा नदीच्या पात्रात एकाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिरवळ पोलिस आणि तेथील रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. घटनास्थळी शहा यांची चारचाकी मिळून आली. उत्तरीय तपासणीनंतर त्या तरूणाचा बुडुन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तशी नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली.मित्रांसोबत पुण्याला गेल्यानंतर अचानक रात्री उशिरा बेपत्ता झाल्याने सौमित याच्यासाठी नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. सकाळी नीरा नदी पात्रात सौमितचा मृतदेह सापडल्याने शहा कुटुंबियांना धक्का बसला.

सौमित शहा हा शनिवारी रात्री बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी रात्री उशीरा सौमितला फोन केला. त्यावेळी त्याचा आवाज घाबरलेल्या स्थितीत होता. त्यानंतर तर त्याने ‘हेल्प’असा मेसेज त्यांच्या मित्रांना पाठवल्याचे समजते. याबाबत सौमितच्या नातेवाईकांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे सौमित याचा बुडून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. पण, तो कसा बुडाला, कसा नदीत पडला याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेबाबत सखोल तपासाची मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलिस निरीक्षक मदने, उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, वृषाली देसाई व अंमलदार घटनास्थळी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *