खिद्रापूर प्राचिन कोपेश्वर मंदिरात राज्यातील पर्यटक आणि भक्तांनी केली मोठी गर्दी

खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचिन कोपेश्वर मंदिरात (temple) त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त (सोमवार) रात्री दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या बरोबर मध्यभागी चंद्र आला होता. या शितल चंद्रप्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. हा वर्षातून एकदा येणारा दुर्मिळ योगायोग पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक आणि भक्तांनी मोठी गर्दी केली होती.

खिद्रापूर येथील रामगोंडा पाटील, डॉ.विद्यादेवी पाटील, श्री शैल्य स्वामी, सौ महादेवी स्वामी या दांम्‍पत्याने सोमवारी पहाटे 3 वाजता कोपेश्वराच्या पूजेचा मान स्वीकारुन यथायोग्य विधीवत पूजा केली. सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि त्रिपुरा प्रज्वलन तसेच महाआरती करण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भजन किर्तनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

कोपेश्वर मंदिराचा परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. मंदिरात (temple) आकर्षक रांगोळ्या काढून त्याभोवती दिवे लावण्यात आले होते. या कार्यक्रमास येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांच्या हातून दिवे प्रज्वलीत करून दिपोत्सव साजरा करण्यात आला.

रात्री 11 वाजून 48 मिनिटांनी स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे. त्याला चंद्रशीला असे म्हंटले जाते. स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून जमिनीवर चंद्रशिलेवर वर्तुळाकार कवडसा पडला होता. हा चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा, जमिनीवरच्या चंद्रशीलेच्या दगडाशी जुळून आला होता. हे दृष्‍य डोळ्यात साठवण्यासाठी उपस्‍थितांनी गर्दी केली होती.

हा वार्षिक योगायोग पाहण्यासाठी मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी, महाबळेश्वर, कर्नाटक व गोवा राज्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी हेरिटेज समितीच्या अमरजा निंबाळकर उपस्थित होत्या. हा उपक्रम राबविण्यासाठी इतिहास अभ्यासक शशांक चोथे, रामगोंडा पाटील, शिव पाटील, दयानंद खानोरे, सोपान मोरे, पंचश्री कोष्टी, माणतेस पाटील, आप्पा कुरुंदवाडे, पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *