माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन
शिरोळ /प्रतिनिधी:
(local news) शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज व श्री दत्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या वतीने इयत्ता दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्यामधील बुद्धिमत्तेत वाढ व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्पर्धेत तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन दत्त साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले आहे.
श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज व दत्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम केले. त्यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची प्रश्नमंजुषा स्पर्धा तीन फेरीत विभागवार होणार आहे. प्रथम फेरीत शालेयस्तरीय बहुपर्यायी प्रश्नमंजुषा सहभागी विद्यार्थ्यांच्या ज्या त्या शाळेत होणार आहे. शालेय स्तरावरील विजेत्या गटाची स्पर्धा व द्वितीय फेरीतील प्रत्येक विभागातील विजेत्या स्पर्धकांची अंतिम स्पर्धा ही 11 डिसेंबर 2022 रोजी श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज येथे होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय चार हजार रुपये, तृतीय तीन हजार रुपये, चतुर्थ दोन हजार रुपये व उत्तेजनार्थ 1000 रुपये, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विभागीय स्तरावरील सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रत्येक संघात दोन स्पर्धक असावेत. सदरची स्पर्धा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित राहील. स्पर्धेसाठी शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. इंग्रजी, गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता या विषयावर सदसची प्रश्नमंजुषा होणार आहे. प्रथम फेरी मधून प्रत्येक शाळेच्या एका संघाची द्वितीय फेरीतील स्पर्धेसाठी निवड होणार आहे. सर्व स्पर्धकांकडे आपल्या शाळेचे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. (local news)
यावेळी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अरुणकुमार देसाई, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, दत्त पॉलिटेक्निक कॉलेजचे संचालक ए. एम. नानिवडेकर, प्राचार्य पी. आर. पाटील, दत्त औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी. बी. पाटील, उपप्राचार्य एन. बी. भोळे, पी. बी. पाटील, विभाग प्रमुख एस. पी. चव्हाण, जे. ए. मुलानी, स्पर्धा संयोजक ए. इ. पाटील, डी. बी. होनमोरे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते.