हवामान आधारित निसर्गावर शेती केल्यास शेतकऱ्यांना फायदा; हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे प्रतिपादन
शिरोळ /प्रतिनिधी:
(local news) हवामान आधारित निसर्गावर शेती केल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. निसर्गाच्या विरोधात शेती केल्यास त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो. पावसाने दिशा बदलली आणि तापमान वाढ झाली तर प्रचंड पाऊस होतो. त्यामुळे प्रत्येक माणसाने एक तरी झाड लावले पाहिजे. झाडामुळेच तापमान कमी होईल. भविष्यात पाऊस कमी पडणार नाही, त्यामुळे श्री दत्त साखर कारखान्याने क्षारपड जमीन मुक्तीसाठी वापरलेली सच्छिद्र पाईपलाईनची योजना सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली तर त्याचा फायदा निश्चितच होईल, असे प्रतिपादन हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी केले.
श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ‘हवामान आधारित शेती’ या विषयावर ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते. अधिक माहिती देताना पंजाबराव डख म्हणाले, बियाणे, खते, पाणी वापरणे या सगळ्या गोष्टी माणसांच्या हातात आहेत. पण निसर्ग हातात नाही. हवामान अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा आणि वातावरणातील बदलाचा अभ्यास करणे आवश्यक असून त्याप्रमाणे शेती करावी. पाऊस येण्याची अनेक नैसर्गिक कारणे असून त्याचाही अभ्यास करावा. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, विज पडणे, ढगफुटी असे प्रकार वारंवार घडतात.
ही परिस्थिती येऊ नये म्हणून हवामानाचा अंदाज लावता आला पाहिजे. त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. प्राणी आणि झाडेही हवामानातील फरक जाणवून देत असतात. त्याकडेही आपले लक्ष असावे लागते. हवामान आधारित शेती केल्यास शेती निश्चितच फायद्याची होईल असे सांगून त्यांनी निसर्गामध्ये घडणाऱ्या विविध बदलांद्वारे नुकसान कसे टाळता येईल याची उदाहरणे दिली. शेतकऱ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांचे, शंकांचे त्यांनी निरसन केले. तसेच दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपले कायमस्वरूपी मार्गदर्शन राहील, अशी ग्वाही पंजाबराव डख यांनी शेवटी दिली.
डॉ. महादेव पवार यांनी नॅनो युरिया टेक्नॉलॉजी संदर्भात शेतकऱ्यांना विस्तृत माहिती दिली. नॅनो युरिया लिक्विडची फक्त फवारणी असून 90% पर्यंत कार्यक्षमता वाढू शकते. त्याचबरोबर हवा, पाणी यांचे प्रदूषण कमी होते असे त्यांनी सांगितले. युवा व्याख्याते वसंतराव हंकारे यांनी आनंदी जीवन या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनीही ऊस उत्पादन वाढीसाठी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहेत याची सविस्तर माहिती दिली. (local news)
प्रारंभी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी करून दिली. ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.
या मेळाव्यास कारखान्याचे उपाध्यक्ष अरुणकुमार देसाई, संचालक रणजीत कदम, विश्वनाथ माने, शरदचंद्र पाठक, विजय सूर्यवंशी, प्रमोद पाटील, महेंद्र बागे ,इंद्रजीत पाटील, दरगू गावडे, शेखर पाटील, महादेवराव धनवडे, दामोदर सुतार, ज्योतीकुमार पाटील, गोरखनाथ माने, बाळासो पाटील (हालसवडे), कलाप्पा टाकवडे, शिवाजीराव माने -देशमुख यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक भागातून शेतकरी, सर्व अधिकारी, खाते प्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.