कवलापूर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा
कवलापूर (ता. मिरज) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकून सुमारे दोनशे तोळे सोने जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे सोने (gold) जालना येथील सराफाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सराफाकडे चौकशी केली जात आहे.
रोहित तानाजी चव्हाण (वय 27, रा. हायस्कूलमागे, दत्तनगर, कुमठे, ता. तासगाव) व संतोष अशोक नाईक (26, कौलाई गल्ली, कवलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख आंचल दलाल यांनी ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक कवलापूर, बुधगाव परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संतोष नाईक व रोहित चव्हाण यांच्याकडे सोने असल्याची माहिती मिळाली.
पथक तातडीने कवलापूरला रवाना केले. संशयित दोघेही कवलापुरातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उभा होते. त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे एक हजार 994 ग्रॅम सोने (gold) सापडले. साधारपणे हे सोने दोनशे तोळे आहे. त्याची किंमत एक कोटी पाच लाख 68 हजार रुपये आहे. हे सोने बिस्कटसारखे आहेत.
सोन्याबाबत संशयितांकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे सोने जालना येथील सराफ व्यावसायिक विक्रम लक्ष्मण मंडले याचे असल्याचे सांगितले. मंडले हा मूळचा पलूस तालुक्यातील बांबवडे गावचा आहे. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मात्र या दागिन्यांबाबत त्याने कोणतेही पुरावे दिले नाहीत. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे, हवालदार सचिन धोत्रे, इम्रान मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.