बुधगावमध्ये चौघांवर कोयत्याने हल्ला

(crime news) महाविद्यालयात डोळे वटारून पाहण्याच्या वादातून बुधगाव (ता. मिरज) येथे चौघांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण केली. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. याप्रकरणी कवलापूर येथील चौघांविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोम्या उर्फ विठ्ठल हाक्के, शिवराज माने, अर्जुन पाटील (तिघे रा. कवलापूर) व अनोळखी एकजण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या विठ्ठल संजय धामणेकर (वय 19), प्रणव संजय लायकर (19), धनराज मारूती माने (20) व शुभम श्रीधर चौगुले (21, चौघे रा. बुधगाव) यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील आहेत. याप्रकरणी विठ्ठल धामणेकर याने फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
जखमी व संशयित बुधगाव येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहेत. सोमवारी दुपारी त्यांच्यात डोळे वटारून पाहण्यावरून वाद झाला होता. यातून त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती. रात्री उशिरा बुधगाव येथील ‘वन्समोर’ हॉटेलसमोर संशयितांनी जखमींना दुपारी झालेला वाद मिटवूया, असे म्हणून बोलावून घेतले.

वाद मिटण्यापेक्षा त्यांच्यातील वाद अधिकच पेटत गेला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. संशयितांनी कोयत्याने हल्ला केला. लोखंडी पाईपनेही चौघांना बेदम मारहाण केली. भररस्त्यावर मारामारीचा हा प्रकार सुरू होता. या मार्गावरून जाणारी अनेक वाहने थांबली. चौघे रक्तबंबाळ होताच संशयित तेथून पसार झाले. अनपेक्षित घडलेल्या या घटनेने तणाव निर्माण झाला होता. परिसरातील दुकाने पटापट बंद झाली. त्यानंतर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण पोलिसांनी जखमींचा जबाब नोंदवून घेतला. मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला. (crime news)

संशयितांच्या शोधासाठी पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, हवालदार रमेश कोळी यांच्या पथकाने घरावर छापे टाकले. मात्र ते सापडले नाहीत. त्यांचे मोबाईलही बंद आहेत. जखमींच्या मित्रांनी मंगळवारी दिवसभर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. संशयितांना तातडीने अटक करण्याची त्यांनी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *