महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यामध्ये लढल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये १२ ठिकाणी उत्तुंग यश
शिरोळ /प्रतिनिधी:
शिरोळ तालुक्यामध्ये झालेल्या १७ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीमध्ये (election) शिरोळ तालुक्यातील महाविकास आघाडीने १२ ठिकाणी उत्तुंग यश मिळवले असल्याची माहिती श्री दत्त कारखान्याचे संचालक शेखर पाटील यांनी दिली.
अधिक माहिती देताना शेखर पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यामध्ये १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्यानपंडित गणपतराव पाटील, मा. खा. राजू शेट्टी, मा. आ. उल्हास पाटील, मा. जि. प. सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी पुढाकार घेऊन स्थानिक गटांशी आघाडी करून निवडणूक लढविली होती. यामध्ये मतदारांनी भरघोस प्रतिसाद देऊन महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखविला आहे. टाकवडे, खिद्रापूर, राजापूर व हेरवाड त्याच पद्धतीने संभाजीपूर, चिंचवाड, कनवाड, अब्दुल लाट, नवे दानवाड, शिवनाकवाडी, लाटवाडी, राजपुरवाडी येथे स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवण्यात आली होती. यामध्ये सरपंच पदाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले.
या निवडणुकीमध्ये (election) जनतेने आघाडीवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन दादा काम करीत आहेत. तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी दादांनी क्षारपड मुक्त जमिनीची कल्पना मांडून प्रत्यक्षात आणली आहे. स्थानिक पातळीवर सर्वांशी स्नेह आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या दादांच्या भूमिकेमुळे राजकारणात सौहार्दाचे आणि सामंजस्याचे वातावरण तयार झाले आहे. याचा फायदा तालुक्यातील सर्व जनतेला होत आहे. आगामी काळातही जनतेच्या हिताला प्राधान्य देऊनच काम केले जाणार असल्याचे शेवटी शेखर पाटील यांनी सांगितले.