शिरोळ : कारवाई न केल्यास यापुढे ‘स्वाभिमानी स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा
पंचगंगा नदीला आलेल्या दूषित (Contaminated) पाण्यामुळे येथील बंधार्याजवळ नदीपत्रात मृत माशांचा मोठ्या प्रमाणात खच साचला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, तेरवाड येथील नदीपात्रात मासे मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर आता शिरोळ बंधार्यानजीक दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव— भावना व्यक्त होत आहेत.
पंचगंगा नदीतील दूषित पाण्यामुळे पाणी फेसाळलेले दिसत आहे. मासे मृत होऊन पाण्यात तरंगत आहेत. बंधार्याजवळ मृत माशांचा खच पडला असून, हे मृत मासे नदीतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे. दूषित (Contaminated) पाण्यामुळे जलचरांबरोबरच नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषण करणार्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दरम्यान, स्वाभिमानीचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही पंचगंगा प्रदूषणप्रश्नी विविध आंदोलने केली. मात्र प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातात. आता तरी प्रदूषण करणार्या घटकावर प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करणार का, असा सवाल व्यक्त करून, कारवाई न केल्यास यापुढे ‘स्वाभिमानी स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.