“शेडशाळची बीज बँकेची सुरु झालेली चळवळ देशापुढे आदर्श ठरेल” प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केला विश्वास
शिरोळ /प्रतिनिधी:
शेडशाळच्या महिलांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेले बीज बँकेचे (Seed Bank) काम हे राष्ट्रनिर्माणाचे मोठे काम आहे. याचा प्रचार आणि प्रसार झाल्यास एक सक्षम पिढी तयार होईल. सकस अन्नामुळे चांगले विचार, योग्य संस्कार व आदर्श कुटुंब संस्कृती निर्माण होईल. बीज बँकेची सुरु झालेली ही चळवळ देशापुढे आदर्श ठरेल, असा विश्वास प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केला.
शेडशाळ येथे महादेव स्वामी मठ येथे आयोजित स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फौंडेशन देशी वाण बीज बँकेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखाना चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते. यावेळी शेतकरी व महिलांना बीज वाटपही करण्यात आले.
उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून येथील महिलांनी अतिशय कष्टाने बीज बँक (Seed Bank) स्थापन करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. हे काम छोटे वाटत असले तरी जगाच्या दृष्टीने फार मोठे आहे. शेतीच्या मातीत सोने पिकविण्याची हिम्मत येथील महिलांमध्ये दिसून येते. आगामी काळात अडीच एकरावर विविध जातीचे वाण तयार करून याची व्यापकता वाढवावी. या स्तुत्य उपक्रमास दत्त उद्योग समूह सर्वोतोपरी सहकार्य करेल. शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले म्हणाले, कीटकनाशके, तणनाशकामुळे पोषक तत्वांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत देशी वाण बियाणे ह आरोग्यदायी ठरणार आहे.
कृषी मंडल अधिकारी निरंजन देसाई म्हणाले, रेडी टू युज संस्कृतीमुळे अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. त्यामुळे चुलीवरच्या जेवणाची संस्कृती पुन्हा येत आहे. शिरोळ तालुका हा शेतीतील क्रांतीचा तालुका आहे. बीज बँक हा अभिनव उपक्रम आहे.
माती परीक्षणचे ए. एस. पाटील यांनी गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या बीज बँकेच्या कामकाजाची माहिती दिली. पत्रकार दगडू माने यांनीही बीज बँक उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी स्व. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत गीत ‘हम होंगे कामयाब…’ सादर करण्यात आले. स्वागत शमशादबी पठाण यांनी केले तर प्रास्ताविक वैशाली संकपाळ यांनी केले. सूत्रसंचालन महेश तारदाळे तर आभार जयश्री शिरढोणे यांनी मानले.
यावेळी दत्त कारखान्याचे संचालक भैय्यासाहेब पाटील, विश्वनाथ माने, जयसिंगपूर उदगाव बँकेचे संचालक महेंद्र बागे, सरपंच गजानन चौगुले, उपसरपंच सौ. भारती लाड, ग्रा. पं. सदस्य सुनील संकपाळ, किरण संकपाळ, रोहिणी कोल्हापुरे, सुनीता नाईक, कवठे गुलंद सरपंच प्रमिला जगताप, पं. समितीच्या छाया कोवाडे, वैशाली संकपाळ, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर ऍग्री मंजुषा कोळी, शंकर कांबळे, पंकज शहापुरे, संजय सुतार, चाँदपाशा पाटील, अस्लम मखमल्ला, विश्राम कोळी, विजयकुमार गाताडे, कवठे गुलंदचे ऋषी शिंदे सरकार, बंडू पाटील, अविनाश कदम, शिवराम केरीपाळे, शेतकरी सोसायटी ग्रुप, पाणी पुरवठा, दूध संस्था, पतसंस्था संचालक, कृषी सहाय्यक वैदेही पाटील, अबोली भोकरे, बीज बँकेच्या सर्व महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.