श्री दत्त कारखान्यावर ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचे महत्त्व याविषयीचे चर्चासत्र उत्साहात
शिरोळ /प्रतिनिधी:
गेल्या काही वर्षांत यंत्राने ऊसतोडणी अनिवार्य बनत आहे. ही तोडणी करताना सध्याच्या परिस्थितीत ठिबकचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी कमी खर्चातील ठिबक सिंचनची (Drip irrigation) प्रात्यक्षिके ठिबक कंपन्यांनी कारखान्याच्या जमिनीवर राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर यांनी दिली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ‘ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचे महत्त्व’ याविषयी कारखाना व्यवस्थापन, शास्त्रज्ञ, कंपनी प्रतिनिधी व शेतकरी यांचे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी वरील निर्णय झाला. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कारखाना चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील हे होते. प्रारंभी स्वागत मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी तर प्रास्ताविक कारखाना संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. मान्यवरांचा सत्कार गणपतराव पाटील यांनी केले.
आडसाली, पूर्व हंगामी, सुरू व खोडवा ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यानंतर ऊस तोडणीपूर्वी संच बाहेर काढता येत नाही यावर उपाययोजना, जमिनीच्या प्रकारानुसार सर्वसाधारण पाणी किती द्यावे, विद्राव्य खते व जैविक खते ऊसपीका करिता किती महिन्यापर्यंत द्यावे, त्याचे प्रमाण काय असावे, एकरी या खतांचा खर्च किती, कमी खर्चात ठिबक सिंचन सुविधा देता येईल काय, लागण खोडवा पीक निघाल्यानंतर सदर ड्रीप जमिनीत नांगरटी बरोबर गाडले तरी चालेल काय, अशी काही ड्रीप संच आहेत का, असल्यास त्याचा खर्च किती, सब सरफेस ड्रीप योजना यशस्वी करता येईल काय, रेनगनचा वापर ऊस पिकासाठी केल्यानंतर ऊस पिकास लागणारे पाणी पुरेसे होईल काय, जमिनीच्या प्रकारानुसार ऊस पिकाकरिता किती फुटाची सरी असावी जेणेकरून ठिबक सिंचनाद्वारे (Drip irrigation) गरजे इतका पाणीपुरवठा होईल, ऊस पिकाकरता किती साईजची लॅटरल व ड्रीपर असावेत, ठिबक सिंचनाच्या संचाची कार्यक्षमता किती कालावधीसाठी असावी याचबरोबर रोपवाटिका मधील रोप लागणीस वापरल्यास शेतात लवकर रुजू होत नाहीत, मुळांची वाढ होत नाही. त्यामुळे उसाचा फुटवा कमी, जाडी कमी, गाळपास जाणाऱ्या उसाची संख्या कमी तसेच उत्पादकता कमी आणि रोपवाटिकेमधील रोपांना गवताळ वाढीचे प्रमाण जास्त आहे अशा विविध बाबीवर चर्चा करण्याचे आवाहन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी यावेळी केले.
माजी शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, व्हीएसआय पुण्याचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.पी. पी. शिंदे, कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्रा. अजय देशपांडे, नेटाफिमचे अरुण देशमुख, फिनोलेक्सचे सुनील पाटील, कोठारीचे जी. एच. यादव तसेच जैन ठिबक कंपनीचे आनंद गुलदगड, विजय माळी, अशोक चौगुले, डॉ. एस. डी. राठोड आदींनी या चर्चासत्रात भाग घेतला. ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले. यावेळी कारखाना संचालक इंद्रजित पाटील, श्रीमती विनया घोरपडे, महेंद्र बागे, कारखाना सचिव अशोक शिंदे, माती परिक्षणचे ए. एस. पाटील, मंजुषा कोळी, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले यांच्यासह सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.