सांगलीत लाखोंची फसवणूक; पैसे घेऊन दलाल फरार

(crime news) मणेराजुरी व परिसरातील १६ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झारखंड येथील दोन व्यापाऱ्यांनी ३६ लाखांची फसवणूक केल्याची घटना आज उघडकीस आली. दरम्यान, हा दलाल पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरू असलेल्या द्राक्ष हंगामातील फसवणुकीचा ही पहिली घटना आहे. दरम्यान, पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

मणेराजुरी परिसरात द्राक्ष हंगाम सुरू झाला असून देशभरातून व्यापारी तालुक्यात आलेले आहेत. झारखंड येथील पप्पू व रिझवान मलिक हे दोघे काही दिवसांपासून मणेराजुरी परिसरातून तासगाव येथील एका मध्यस्थाच्या माध्यमातून द्राक्ष खरेदी करत आहेत. हे दोघे आरवडे (ता. तासगाव) येथे खोली घेऊन भाड्याने राहत होते.

मात्र ते आज सकाळी त्यांच्याकडे गेलेल्या शेतकऱ्यांना दोघे गायब झाल्याचे लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली. ज्यांनी या व्यापाऱ्यांना द्राक्ष दिलेली होती, त्यांनी शोधाशोध सुरू केली, भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

मात्र फोनही बंद येत असल्याने शेतकऱ्यांनी त्या मध्यस्थाला घेऊन तासगाव पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात शेतकरी थांबून होते. या शेतकऱ्यांकडे स्थानिक मध्यस्थाचे नाव व व्यापाऱ्याचा फोन नंबर याशिवाय काहीही नाही.

काही दिवस या व्यापाऱ्यांनी रोखीने द्राक्ष खरेदी करून विश्वास संपादन केला. सुरवातीचे पैसे रोख दिले. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून खरेदी केलेल्या द्राक्षांचे पैसे आज उद्या देतो, असे म्हणत या व्यापाऱ्यांनी पोबारा केला. (crime news)

मणेराजुरी येथील १६ द्राक्ष शेतकऱ्यांची ३६ लाख २१ हजार २९२ रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १२ हजारांपासून ४ लाखांपर्यंत फसवणूक झालेले शेतकरी आहेत.

रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता

तालुक्यातील अन्य काही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असण्याची शक्यता वर्तवली जात असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मणेराजुरीतील शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा गंडा द्राक्ष व्यापाऱ्यांनी घातला होता. यंदा द्राक्ष व्यापाऱ्यांकडून फसवणुकीची ही पहिलीच घटना समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *