शिरोळ तालुक्यातून गुलाबाची बाजारपेठ झाली ‘गुलाबी’
हृदयातील भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी ज्यांची धडपड असते व आतुरतेने ते ज्या दिवसाची वाट पाहत असतात, तो म्हणजे आजचा व्हॅलेंटाईन डे. ‘तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल… जोपर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल’… हे सांगण्यासाठी दिला जातो तो फक्त आणि फक्त (rose) लाल गुलाब. अशा या गुलाबांची मागणी वाढली असून गेल्या आठ दिवसांत एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून चार लाख गुलाब फुलांची विक्री झाली आहे.
गुलाबाच्या प्रत्येक फुलाचा रंगाचा वेगळा अर्थ असतो. पण व्हॅलेंटाईन डे दिवशी केवळ लाल गुलाबालाच प्रेमाचा अर्थ असतो. लॉकडाऊननंतर मुक्तपणे साजरा होणारा हा पहिला व्हॅलेंटाईन डे आहे. त्यामुळे निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणार्या गुलाबाची बाजारपेठ ‘गुलाबी’ झाली आहे.
व्हॅलेंटाईन डे दिवशी आपल्या जोडीदाराला, मित्राला किंवा खास व्यक्तीला गुलाब (rose) देऊन आपल्या भावना व्यक्त करतात. आता मोबाईल युगातही गुलाब फुले देऊनच प्रेम भावना व्यक्त केली जात असल्याने गुलाब फुलांची मागणी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरमधून पूर्वी आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशांत गुलाब फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती. कोरोनापूर्वी या देशात अंदाजे साडेसात लाख गुलाबांची निर्यात करण्यात आली होती.
कोरोना काळात निर्यात बंद झाल्यानंतर स्थानिक उत्पादकांनी गुलाबांची लागवड कमी केली. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांमध्ये गुलाब पाठवली जात आहेत. यामध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळूर आदींचा समावेश आहे. भविष्यात कोल्हापुरातील गुलाब पुन्हा साता समुद्रापार जाईल, असे गुलाब फुलांचे उत्पादक रमेश पाटील यांनी सांगितले.