जमिनीचे पृथक्करण व तज्ज्ञांशी संवाद साधून शेती केल्यास फायदेशीर : नॅशनल ग्रेप रिसर्च सेंटर पुण्याचे संचालक व सल्लागार विभाकर पाटील
शिरोळ – प्रतिनिधी:
(local news) शास्त्रशुद्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. खत, पाणी यांची योग्य मात्रा आणि माती परीक्षण केल्यास शेती उत्पादन वाढीला पोषक ठरेल. जमिनीची सुपीकता ही विविध घटकांच्या संतुलनावर अवलंबून असते. त्याचा अभ्यास करावा. जमिनीचे पृथक्करण व तज्ज्ञांशी संवाद साधून शेती केल्यास शेती निश्चितच फायदेशीर होईल, असे प्रतिपादन नॅशनल ग्रेप रिसर्च सेंटर पुण्याचे संचालक व सल्लागार विभाकर पाटील यांनी केले.
श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर दत्त मंदिर शेजारी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यामध्ये ‘ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व पाणी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
पशुसंवर्धन विभाग चितळे डेअरीचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी हे ‘दुग्धव्यवसायातील जनावरांचे व्यवस्थापन’ या विषयावर बोलताना म्हणाले, पशुधनाच्या कामातील रोजच्या रोज नोंदी ठेवणे आवश्यक आहे. जनावरांमध्ये होणारे आजार व त्यांचा अभ्यासही शेतकऱ्यांना असायला हवा. जनावरांची कॉल सेंटरच्या माध्यमातून सर्व माहिती अद्यावत ठेवता येते. अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्याच पद्धतीने मुक्त संचार गोठा फायदेशीर असून दुधाचे उत्पादन वाढते. यासाठी पशुधन आणि शेतीपूरक दुग्ध व्यवसायाचे व्यवस्थापन झाल्यास शेतकरी आर्थिक संपन्न बनेल.
वनराईचे सचिव अमित गाडेकर म्हणाले, जमिनीचे वाळवंटीकरण, जमीन नापीक होणे, क्षारपड होणे तसेच विषमुक्त, सुरक्षित, सकस आणि सेंद्रिय अन्न मिळण्याची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. गणपतराव पाटील यांच्या दूरदृष्टीने या दोन्हीही समस्यांवर शिरोळ तालुक्यात काम होत आहे हे खरोखरच उल्लेखनीय आहे. क्षारपड मुक्तीची चळवळ ही आता लोकचळवळ झाली आहे. ही चळवळ देश पातळीवर गेल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल.
गणपतराव पाटील म्हणाले, शेतीमध्ये पाणी, खत यांची बचत करण्यासाठी ड्रीप व्यवस्था आवश्यक आहे. मशीनच्या सहाय्याने ऊस तोड होताना ड्रीपचे नुकसान होऊ शकते. यामुळे पाईप, ड्रीप यांची किंमत कमी करून अल्पदरात एकरी ड्रीप व्यवस्था व्हावी यासाठी कंपनीशी बोलणे झाले असून त्यांनीही ही सुविधा देण्याचे मान्य केले आहे. खत भेसळ होते अशी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून जागरुकता दाखवावी. वनराईने पाणी, खत, नापीक, क्षारपड जमीन याबाबत दोन चार गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर काम करून दिशा द्यावी असे आवाहनही त्यांनी केले. (local news)
वक्त्यांनी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्तविक मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांनी केले. सूत्र संचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर आभार ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी मानले.
यावेळी व्हा. चेअरमन अरुणकुमार देसाई, संचालक रघुनाथ पाटील, इंद्रजित पाटील, बाबासो पाटील, महेंद्र बागी, शेखर पाटील, प्रमोद पाटील, विश्वनाथ माने, दरगु गावडे माने, संजय पाटील, निजामसो पाटील, विजय सूर्यवंशी, भूपाल खामकर, सुरगोंडा पाटील, धनाजी पाटील नरदेकर, दामोदर सुतार, अशोकराव कोळेकर, मुसा डांगे, संजय पाटील कोथळीकर, ज्योतिरादित्य पाटील, साताप्पा बागडी, सुरेश पाटील, रावसाहेब चौगुले, सुरगोंडा पाटील, सुभाष शहापुरे यांच्यासह शेती विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.