जमीन क्षारपड मुक्तीसाठी मृद व जलसंधारण खात्याचे सहकार्य राहील : शासकीय अपिलय अधिकारी बा. वि. आजगेकर
शिरोळ (प्रतिनिधी) :
श्री दत्त साखर कारखाना चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यामध्ये जमीन क्षारपड (saline) मुक्तीचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या प्रकल्पामध्ये भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी गणपतराव पाटील यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग हा समन्वयाचे काम करीत आहे. अशाच पद्धतीची नवीन सुधारणा करून शेतकऱ्यांची वैयक्तिक उन्नती होण्यासाठी आमच्या खात्यामार्फत सर्व प्रकारचे सहकार्य नेहमीच राहील, असे आश्वासन कोल्हापूरचे शासकीय अपिलय अधिकारी बा. वि. आजगेकर यांनी दिले.
दत्तवाड येथील 100 एकर क्षारपड (saline) जमीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुख्य पाईपलाईन टाकणे कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते पूजाविधी व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
वनराईचे सचिव अमित वाडेकर म्हणाले, जगभरामध्ये जमीन नापीक होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून ही जागतिक समस्या झाली आहे. इस्रोच्या अहवालानुसार राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्र यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढचा काळ हा जमिनीची पुनर्स्थापना करण्याचा, जमिनीला पुनर्जीवन देण्याचा काळ असणार आहे. यासाठी काळाची पावले ओळखून, अभ्यास करून शेतकऱ्यांनी क्षारपडमुक्त जमीन करण्यासाठी प्रयत्न करावेत. गणपतराव पाटील यांच्या माध्यमातून होत असलेले क्षारपड मुक्तीचे काम देश पातळीपर्यंत घेऊन गेल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच क्षारपड मुक्तीच्या योजनेत शेतकऱ्यांनी भाग घेऊन आपली नापीक जमीन सुपीक करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी कारखान्याच्या वतीने सर्व ती मदत केली जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगान्ना यांनी या योजनेची माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक प्रविण सुरवशी यांनी केले. आभार बसगोंडा पाटील यांनी मानले. यावेळी इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे, सुदर्शन तकडे, धनंजय मुळीक, अजित वठारे, देवेंद्र सुरवशी, देवराज पाटील, शांतीनाथ धोतरे, सुधाकर गळतगे, राजू पाटील, सुरेश पाटील, प्रकाश चौगुले, कलगोंडा सुरवशी, शितल धोतरे, आप्पासो सिदनाळे, श्रीपाल सुरवशी, संजय सुतार, बाबासो पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.