ओबीसी जनगणनेच्या समर्थनार्थ सर्व पक्ष व संघटनांनी खुली चर्चा करावी प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
नांदणी / प्रतिनिधी:
सध्याच्या राजकीय वातावरणात ओबीसी जनगणनेचा (Censuses) प्रश्न बाजूला पडला आहे. सत्ता केंद्रामध्ये जाण्याच्या संधी कमी होत आहेत. बाजारपेठ हातातून गेली आहे. पारंपरिक व्यवसाय आधुनिकतेने मारून टाकले आहेत. नवीन व्यवसायामध्ये शिरण्याची शक्यता मंडल आयोगाने निर्माण केली होती तीही मावळली असून ओबीसींच्या संधी त्यांच्या हातातून घालविण्याचे कारस्थान सुरू आहे. ओबीसी समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे व ओबीसी जनगणनेच्या समर्थनार्थ सर्व पक्ष व संघटनांनी खुली चर्चा करावी, असे आवाहन प्रा. अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी केले.
शिरोळ तालुका ओबीसी सोशल फौंडेशन, नांदणीच्या वतीने आयोजित ओबीसी जागृती मेळाव्यात ओबीसी जातनिहाय जनगणना, आरक्षण, बहुजन महापुरुषांची विचारधारा व राजकीय सहभाग अशा विविध विषयांवर मुक्त संवाद झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
प्रा. अंजलीताई आंबेडकर पुढे म्हणाल्या, बहुजन समाजाच्या तीन महिला या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या प्रतिक बनल्या आहेत. राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी महिलांच्या हातात सत्ता आली की किती न्यायपूर्ण प्रशासन चालू शकते हे दाखवून दिले. क्रांतीमाता सावित्रीबाईंनी बहुजन समाजातील स्त्रियांच्या हातामध्ये शिक्षण जावे यासाठी प्रयत्न केले. तर सावित्रीबाईंच्या बरोबरीने मुस्लिम मुलींच्या पर्यंत शिक्षण देण्याचे काम फातिमाबी यांनी केले. बहुजनांच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बहुजन स्त्रियांच्यामध्ये एकूण अस्तित्वाचा प्रश्न देणाऱ्या या तिघींना आपण स्वीकारले पाहिजे. ओबीसी आणि वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायासंदर्भात आपण एकत्रितपणे प्रयत्न केला पाहिजे.
डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, देशातील ओबीसींना सत्तेचा समभाग मिळवण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पहिजे. त्यासाठी महाराष्ट्रातील 288 आमदारांना ओबीसी सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने आमदारांच्या लेटरहेडवर ओबीसी जनगणना (Censuses) समर्थनार्थ की विरोधात याबद्दल खुलासा घ्यावा. 50 टक्के पेक्षा जास्त आमदारांनी जर समर्थनात पत्र लिहून दिले तर बिहारप्रमाणे महाराष्ट्रात राज्यपालांच्या मदतीने इम्पीरिकल डेटा व जनगणना करावीच लागेल. बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार एकत्र येणे ही काळाजी गरज आहे. प्रा. नागोराव पांचाळ यांनी मंडल आयोग व ओबीसी समाज याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रा. सोमनाथ सांळुखे यांनी जातनिहाय जनगणना ओबीसींच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आरक्षण यासाठी महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. सांगली जिल्हा अध्यक्ष सुनिल गुरव यांनी ओबीसी जागृत करायचा असेल तर ओबीसी समाजाने महापुरुषांचे विचार समजावून घेतले पाहिजेत असे मनोगत व्यक्त केले.
बाबासाहेब नदाफ यांनी क्रांतीचळवळ गीत सादर केले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष बाबासो बागडी यांनी केले. सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजीवकुमार गुरव यांनी केले. तर आभार इब्राहिम मोमीन यांनी मानले. नांदणी सरपंच सौ. संगिता तगारे, उपसरपंच अजय कारंडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे, प्रसिद्धी प्रमुख संजय सुतार, चंद्रकांत मालवणकर सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व बहुजन नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.